रत्नागिरी : इराण आणि इस्रायल दरम्यान उसळलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका परदेशात कामासाठी गेलेल्या कोकणी सुपुत्रांना बसला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण 13 व्यक्ती दुबई येथे अडकल्याची चिंताजनक माहिती समोर आली होती. मात्र, प्रशासकीय पातळीवरील हालचाली आणि विमान सेवांच्या समन्वयामुळे यातील 10 व्यक्ती सुखरूप भारतात परतल्या आहेत. उर्वरित 3 व्यक्ती तांत्रिक कारणास्तव अद्याप दुबईतच असून, त्यांनाही लवकरच मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
गेल्या काही दिवसांपासून युद्धजन्य परिस्थितीत तणावामुळे आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. यातच रत्नागिरी जिल्ह्यातील 13 व्यक्ती दुबईत अडकून पडले होते. युद्धामुळे विमान उड्डाणे रद्द झाल्याने या सर्वांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता, ज्यामुळे त्यांच्या ग्रामीण भागातील कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण होते. अडकलेल्या 13 जणांपैकी 10 जणांना पर्यायी विमानाची व्यवस्था करून भारतात आणण्यात यश आले आहे. आपल्या माणसांना सुखरूप पाहून त्यांच्या कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. मात्र, उर्वरित 3 व्यक्तींचे फ्लाईट शेड्यूल न झाल्यामुळे त्यांना सध्या तिथेच थांबावे लागले आहे. या तिघांचीही प्रकृती सुरक्षित असून, विमान कंपनीशी संपर्क साधून त्यांच्या परतीचा मार्ग मोकळा केला जात आहे.