रत्नागिरी : जिल्ह्यात गणेशोत्सवाची सांगता मोठ्या उत्साहात, भक्तीभावपूर्वक झाल्यानंतर आता सर्व भक्तांना नवरात्रीची आतुरता लागली आहे. यासाठी लगबग सुरू झाली आहे. ठिकठिकाणी मंडळ अध्यक्षपदासाठी व विविध पदाधिकारी निवडीसाठी बैठका घेण्यात येत आहेत. काही ठिकाणी मंडप उभारण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. नवरात्रानिमित्त शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठाही सजू लागल्या असून वेगवेगळ्या दुर्गामातेची आरास करण्यासाठी लागणारे विविध साहित्य, नऊ रंगाच्या साड्या, गरबा, दांडियासाठी लागणारे साहित्य विक्रीस ठेवण्यात आले आहे.
नवरात्रोत्सव अवघ्या काहीच दिवसांवर येवून ठेपला असून मूर्तीकारांकडून दुर्गादेवी मूर्तीवर अखेरचा हात फिरवला जात आहे. यंदा शारदीय नवरात्रोत्सवाला 22 सप्टेंबरपासून घटस्थापनेने प्रांरभ होणार आहे. 2 ऑक्टो.ला विजयादशमीनंतर नवरात्रौत्सवाची सांगता होणार आहे. त्यामुळे भक्तांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत आहे. मुंबईकरांनी महालक्ष्मी माताराणी या देवींच्या मूर्ती वाजत-गाजत नेवून मंडपात नेल्या आहेत. विविध जिल्ह्यात तयारी सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही नवरात्र तयारीला वेग आला आहे. यंदा घटनस्थापनेपासून अकराव्या दिवशी दसरा आहे. यानिमित्त ग्रामीण भागातील विविध मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. नऊ दिवस विविध कार्यक्रम होणार असल्यामुळे आतापासून तयारी सुरू झाली आहे. सोमवारी घटनस्थापना झाल्यानंतर देवीच्या मूर्तीची स्थापना केली जाणार आहे. त्यासाठी विविध मंडळाकडून मंडप उभारणी सुरू आहे. काही मंडळांकडून पदाधिकारी निवडीही झाल्या आहेत. एकंदरीत, रत्नागिरीकरांना नवरात्रीची आतुरता लागली आहे.