रत्नागिरी : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात १ जून ते ६ सप्टेंबरदरम्यान २ हजार ५२७ सरासरी, तर ७५.१२ टक्के पाऊस झाला आहे. गतवर्षी याच कालावधीत ३ हजार ३५६ मि.मी. आणि ९९.७८ टक्के पाऊस पडला होता. जिल्ह्याची वार्षिक सरासरी तुलनेत तब्बल ८३७.१७ मि.मी. पावसाची तूट आहे. गतवर्षीपेक्षा यंदा २४.७२ टक्के पाऊस कमी झाला आहे. सप्टेंबर महिन्यात मोठ्या पावसाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
रत्नागिरी जिल्ह्याची वार्षिक सरासरी ३ हजार ३६४.२२ मि.मी. इतकी आहे. मात्र, यंदा मान्सून वेळेवर येवूनही म्हणावा तितका पाऊस झाला नाही. ऐन पावसाळ्यात जिल्ह्यात १८ टँकरने वाडी, वस्तीवर पाणीपुरवठा सुरू होता. जूनमध्ये काही दिवस व जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यावरील पाणी संकट टळले. जुलै महिन्यात पावसाने जिल्ह्याला झोडपून काढल्यामुळे नद्या, धरणे तुंडूंब भरले आहे. पाण्याचा प्रश्न मिटला आहे. दुसरीकडे चांगल्या पावसामुळे यंदा उद्दिष्टापेक्षा अधिक ५२ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर भात, नाचणीची पुनर्लागवड करण्यात आली. मात्र, ऑगस्ट महिन्यात पावसाने निराशा केली. गतवर्षीपेक्षा ऑगस्ट महिन्यात यंदा पाऊस कमीच पडला आहे. त्यामुळे भात पिके धोक्यात आली होती. सप्टेंबर महिन्यात पावसाने समाधानकारक सुरूवात केली आहे. तरीही गतवर्षी याच कालावधीत जिल्ह्यात साडेतीन हजार मि.मी. पाऊस झाला, तर यंदा ८३० मि.मी.ने कमी पाऊस झाला असून तूटही वाढली आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्या, धरणातील पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. जिल्ह्यात सुरू असलेले टँकर जून महिन्यातच बंद करण्यात आले.
खेडमध्ये सर्वाधिक तर रत्नागिरीत सर्वात कमी पाऊस
जिल्ह्यात तालुकानिहाय पाहता खेडमध्ये सर्वाधिक ३ हजार १९० मि.मी. तर रत्नागिरी तालुक्यात सर्वात कमी १ हजार ९०० मि.मी. पाऊस झाला. जिल्ह्याची सरासरी पावसाची स्थिती पाहता अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. आगामी काळात मोठ्या पावसाकडे लक्ष लागून राहिले आहे.