रत्नागिरी ः दिवाळीच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी रात्री जोरदार वादळी पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपले. वादळी पावसाला ढगाच्या गडगडाटासह विजांच्या लखलखाटाचीही साथ होती. पावसामुळे वीजपुरवठाही खंडित करण्यात आला. अनेक भागात रात्री दहा वाजेपर्यंत पावसाचा मुक्काम राहिल्याने पहिल्यांदाच रत्नागिरी जिल्ह्यात ‘पावसाळी दिवाळी’ साजरी झाली. दरम्यान, रत्नागिरीसह किनारी भागात अवकाळी पावसाचे सावट सोमवारपर्यंत कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
जिल्ह्यात ‘ऑक्टोबर हिट’चा प्रभाव हळूहळू कमी होऊ लागला आहे. सकाळच्या सत्रात दाट धुकेही पडू लागले आहे. त्यामुळे थंडीची चाहूल लागली आहे. मात्र, बुधवारसह गुरुवारी सायंकाळी अचानक पावसाने हजेरी लावल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी विजांच्या कडकडाटासह जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाचा जोर सुरू होता. वेगवान वार्यामुळे झाडे पडून घरांचे पत्रे उडाल्यामुळे नुकसान झाले आहे. मात्र, त्यानंतर पावसाने निरोप घेतला असून, हवेतील उष्मा वाढला आहे. तापमानात अचानक वाढ झाल्यामुळे हवेत उष्म्याचा प्रभाव जाणवू लागला आहे. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात खर्या अर्थाने तीव्र उन्हाचे चटके बसू लागले आहेत. त्यामुळे गेले अनेक दिवस रखडलेली भात कापणीची कामे वेगाने सुरू झालेली आहेत.
रत्नागिरीत गुरुवारी अचानक आलेल्या पावसाने दुकानदारांची धावपळ उडाली. राम आळी, राधाकृष्ण नाका, मारुती आळी या शहरी भागासह ग्रामीण भागातही स्त्यावर पाणी साचल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. दिवाळीनिमित्त फटाके, कपडे यासह रोषणाईचे साहित्य विक्रीसाठी रस्त्यावर बसलेल्या विक्रेत्यांची पावसामुळे धावपळ झाली. साहित्य भिजल्यामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे. गुरुवारी रात्री रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागात दिवाळीची पहिलीच रात्र पावसाळी आणि लखलखाटी ठरली. शुक्रवारी सकाळी मात्र वातावरण कोरडे झाले. पहाटे धुक्याचे प्रमाण वाढल्याने हलका गारवाही वातावरणात होता.