रत्नागिरी : विद्यार्थ्यांना आधार पडताळणीच्या कामात रत्नागिरी जिल्ह्याने बाजी मारली असून, राज्यात दुसरे स्थान मिळवले आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या आधार पडताळणीचे तब्बल ९८.२१ टक्के काम पूर्ण झाले असून, केवळ २ हजार ५४९ विद्यार्थ्यांची पडताळणी प्रलंबित आहे. संगमेश्वर, लांजा, तालुक्याने आघाडी घेतली आहे. येत्या काही महिन्यांत जिल्हा आधार पडताळणीत अव्वल येण्याच्या मार्गावर आहे.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी तसेच शैक्षणिक कामकाजातील माहिती अचूक राहण्यासाठी विद्यार्थ्यांची आधार पडताळणी महत्त्वाची ठरते. जिल्ह्यात शिक्षण विभागाच्या माध्यमातून आधार पडताळणीचे काम सातत्याने राबविण्यात आले. त्याचा परिणाम म्हणून रत्नागिरीचा राज्यात डंका वाजला असून दुसरे स्थान पटकावले आहे. २०२२-२३ पासून युडीआयएसई प्लसच्या माध्यमातून राज्यासह देशपातळीवर प्रत्येक विद्यार्थ्यांची स्वतंत्र माहिती नोंदवण्याची मोठी प्रक्रिया सुरू झाली. शाळांची संच मान्यता अचूक करणे, शैक्षणिक प्रवास ट्रॅक करणे या उद्देशाने आधार पडताळणी सुरू झाली.
ऑगस्ट महिन्याच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये एकूण १ लाख ९१ हजार ६८२ विद्यार्थी आहेत. त्यापैकी १ लाख ९१ हजार ८५ विद्यार्थ्यांचे आधार उपलब्ध आहे. आतापर्यंत १ लाख ८८ हजार ४० विद्यार्थ्यांची पडताळणी पूर्ण झाली आहे. उर्वरित अडीच हजार विद्यार्थ्यांची पडताळणी प्रलंबित आहे. त्यामुळे जिल्ह्यात आधार पडताळणीचे काम ९८.२१ टक्क्पर्यंत पोहोचले आहे. जिल्ह्याच्या एकूण विद्यार्थ्यांच्या तुलनेत उपलब्धतेचे प्रमाण समाधानकारक असल्याचे सांगण्यात आले.