राजापूर : जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे. शुक्रवारपासून (16 जानेवारी) उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होईल. यापार्श्वभूमीवर तालुक्यातील सहा जि. प. गटांसह त्या अंतर्गत समाविष्ट असलेल्या 12 पंचायत समिती गणांत उमेदवारीसाठी जोरदार चुरस पाहावयास मिळत आहे. इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी असून उमेदवारांची निवड करताना प्रत्येक पक्षापुढे मोठे आव्हान उभे ठाकणार आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सहाही जिल्हा परिषद गटात जोरदार चुरस निर्माण झाली आहेत. उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा पाहावयास मिळत आहे.
जाहीर आरक्षणामध्ये वडदहसोड व धोपेश्वर हे दोन जिल्हा परिषद गट सर्वसाधारण, जुवाठी गट नागरिकांचा मागास प्रवर्ग व तळवडे, कातळी, साखरी नाटे असे तीन गट सर्वसाधारण महिला आरक्षित आहेत. यावेळी तालुक्यात नागरिकांचा मागास महिला प्रवर्गाला जिल्हा परिषद आरक्षणामध्ये संधी मिळालेली नाही. तालुक्यात वडदहसोळ, तळवडे, जुवाटी, धोपेश्वर, साखरीनाटे, कातळी असे जि.प. गट असून काही महिन्यांपूर्वी झालेल्या प्रभाग रचनेत जरी एकही जि. प. गट तालुक्यात वाढला नसला तरी झालेल्या रचनेत सर्व गट नवीन नावाने अस्तित्वात आले आहेत. जुन्या नावाने एकही गट आता ओळखला जाणार नाही.
आरक्षणात वडदहसोळ व धोपेश्वरमध्ये सर्वसाधारण, तर जुवाटी नागरिकांचा मागास प्रवर्ग असे आरक्षण जाहीर झाले आहे. उर्वरित तीन जि. प. गट कातळी, साखरीनाटे आणि तळवडेत सर्वसाधारण महिला असे आरक्षण पडले आहे. त्यामुळे सर्व जि.प. गटात जोरदार स्पर्धा सुरू झाली आहे. वडदहसोळ जि.प. गट पूर्वी ओणी या नावाने ओळखला जात होता. या जि. प. गटाला यापूर्वी जिप अध्यक्ष पदासह बांधकाम, शिक्षण अशी सभापतीपदे लाभली आहेत. आता वडदहसोळ या नवीन नावाने ओळख झालेल्या या गटात मोठी चुरस होणार असल्याचे चित्र आहे. सर्वसाधारण म्हणून हा गट अनारक्षित राहिल्याने येथे हवश्या, नवश्या गवश्या इच्छुकांची मांदियाळी पहावयास मिळत आहे.
तळवडे जि.प. गट पूर्वी पाचल नावाने ओळखला जात होता. तालुक्यातील हा सर्वात मोठा व राजकीयदृष्ट्या पॉवरफुल गट मानला जातो. मागील अनेक वर्षात बांधकाम, महिला बाल कल्याण सभापती पदे या गटाला लाभली आहेत. हा गट आरक्षणात सर्वसाधारण, महिला असा आरक्षित झाल्याने येथून मोठी स्पर्धा सुरु झाली आहे. काही दिग्गज महिला उमेदवार येथून निवडणूक लढविण्यास सज्ज असल्याचे समजते. जुवाटी जि. प. गट हा पूर्वाश्रमीचा केळवली गट मात्र आता तो जुवाटी नावाने अस्तित्वात आला आहे. हा गट नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षित झाल्याने आता या गटातही मोठी स्पर्धा असणार आहे. अनेक दिग्गज येथून निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी सज्ज आहेत. यापूर्वी या गटाला केवळ महिला बालकल्याण समितीचे सभापतीपद भूषविता आले आहे.
धोपेश्वर गट हा यापूर्वी कोदवली नावाने ओळखला जात होता. यावेळी आरक्षणात सर्वसाधारण गट पडला असून येथेही मोठी स्पर्धा पहावयास मिळत आहे.अनेकजण उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. प्रत्येक पक्षाकडून उमेदवारी मिळण्यासाठी बरीच मंडळी बाशिंग बांधून तयार आहेत.
कातळी जि.प. गट म्हणजे पूर्वीचा सागवे गट. सर्वसाधारण महिला असा गट आरक्षित झाल्याने येथे चुरस नसली तरी अनेक महिला इच्छुक आहेत. यापूर्वी या गटाला जि. प. उपाध्यक्षपद, शिक्षण सभापती, महिला बालकल्याण सभापतीपदे मिळाली आहेत. साखरीनाटे जि. प. गट तालुक्यात महत्त्वाचा गट ओळखला जातो. केवळ राजापूर तालुकाच नव्हे तर राज्य व देशात प्रकल्पातील संघर्ष जो समोर आला ते सर्व प्रकल्प या जिल्हा परिषद गटात येतात. यामध्ये जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प, नाणार रिफायनरी प्रकल्प, आयलॉग प्रकल्प यातील संघर्ष सर्वांनी पाहिला आहे. शिवसेनेला या प्रकल्पाने मतांच्या रूपात भरभरून कौल दिला आहे.
पूर्वी देवाचे गोठणे नावाने ओळख असलेला हा गट आता साखरीनाटे या नावाने आता ओळखला जात आहे. सर्वसाधारण महिला असे आरक्षण जाहीर झाल्याने अनेक महिला येथून लढण्यास तयार आहेत. मागीलवेळी शिक्षण सभापतीपद या गटाला लाभले होते. शिवसेना, शिंदे गटाचे तालुकाप्रमुख दीपक नागले यांनी ते पद भूषवले होते. तालुक्यात दोन गट सर्वसाधारण, तीन गट सर्वसाधारण महिला आणि गट नागरिकांचा मागास प्रवर्ग असे आरक्षित आहेत.