Konkan Railway Rajapur Station Incident Pudhari
रत्नागिरी

Konkan Railway Ceiling Collapse | राजापूर रोड रेल्वे स्थानकातील प्रतीक्षालयाचे सिलिंग कोसळले

प्रवासी प्लॅटफॉर्मवर गेल्याने मोठी दुर्घटना टळली

पुढारी वृत्तसेवा

Konkan Railway Rajapur Station Incident

राजापूर : कोकण रेल्वे मार्गावरील राजापूर रोड रेल्वे स्थानकातील प्रवासी प्रतीक्षालयाचे सिलिंग मंगळवारी रात्री सुमारे साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने त्याचवेळी मुंबईकडे जाणारी कोकणकन्या एक्स्प्रेस स्थानकात येणार असल्याने प्रतीक्षालयात थांबलेले सर्व प्रवासी प्लॅटफॉर्मवर गेले होते. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. काही क्षणांचा विलंब झाला असता तर सिलिंगखाली प्रवासी अडकून जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

घटना घडल्यानंतर स्थानक परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सिलिंग कोसळल्याची माहिती मिळताच स्थानक प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कोसळलेल्या भागाखाली कोणी अडकले आहे का, याची तत्काळ खातरजमा करण्यात आली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नाही. मात्र, या प्रकारामुळे स्थानकाच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत आणि देखभाल व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राजापूर विभागातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. कोसळलेले सिलिंग हटवून दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले. तसेच पुढील धोका टाळण्यासाठी संबंधित भाग सुरक्षित करण्यात आला.

विशेष म्हणजे, गेल्या दोन वर्षांतील ही अशा स्वरूपाची दुसरी घटना आहे. शासनाच्या पर्यटन विकास योजनेअंतर्गत सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी खर्च करून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राजापूर रोड रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण आणि आधुनिकीकरण करण्यात आले होते. या विकासकामांमुळे स्थानकाचा चेहरामोहरा बदलला असला, तरी काम सुरू असतानाच एकदा छताचा काही भाग कोसळल्याची घटना घडली होती. त्यावेळीही बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

आता अवघ्या दोन वर्षांत पुन्हा प्रतीक्षालयाचे सिलिंग कोसळल्याने त्या शंकांना अधिक बळ मिळाले आहे. लाखो रुपयांचा निधी खर्च करून करण्यात आलेल्या विकासकामांची गुणवत्ता, वापरण्यात आलेले साहित्य आणि देखभाल व्यवस्थेची कार्यक्षमता यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सार्वजनिक वापराच्या अशा महत्त्वाच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे प्रवाशांमध्येही नाराजीचे वातावरण आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच स्थानक परिसरातील सर्व इमारती आणि बांधकामांची तातडीने तांत्रिक तपासणी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी रेल्वे प्रवासी, स्थानिक नागरिक आणि विविध संघटनांकडून करण्यात येत आहे. एका संभाव्य मोठ्या दुर्घटनेतून प्रवासी बचावले असले, तरी भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT