Bribery Case Pudhari
रत्नागिरी

Rajapur Bribery Case : महसूल विभाग पुन्हा लाचखोरीच्या भोवऱ्यात

दोन महिला कर्मचाऱ्यांवरील कारवाईनंतर भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

पुढारी वृत्तसेवा

राजापूर : सातबारा उताऱ्यावरील फेरफार नोंद करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी महसूल विभागातील दोन महिला कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडल्याची घटना ताजी असतानाच, राजापूर तालुक्यातील वाढत्या लाचखोरीच्या घटनांबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

या कारवाईमुळे महसूल विभागाची प्रतिमा पुन्हा एकदा मलिन झाली असून तालुक्याच्या प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राजापूर तालुक्यात मागील दशकभरात विविध विभागांमध्ये लाचखोरीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. विशेषतः महसूल विभागातील प्रकरणांची संख्या अधिक असल्याचे दिसून येते. यामध्ये तलाठी, मंडळ अधिकारी, लिपिक, तालुका पुरवठा अधिकारी अशा विविध पदांवरील कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

काही वर्षांपूर्वी तत्कालीन तहसीलदारालाच लाचलुचपत विभागाने सापळ्यात पकडल्याची घटना तालुक्यात मोठी खळबळ उडवणारी ठरली होती. तसेच तालुका कृषी विभागात झालेल्या कारवाईत एकाच वेळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याने त्या प्रकरणाची राज्यभर चर्चा झाली होती.

ग्रामीण पाणीपुरवठा, शिक्षण, ग्रामविकास आदी विभागांतील अधिकारी आणि कर्मचारीही यापूर्वी लाचखोरीच्या कारवायांमध्ये अडकलेले आहेत. दोन दिवसांपूर्वी तळवडे सजा अंतर्गत फेरफार नोंद करण्यासाठी लाच मागितल्याच्या आरोपावरून मंडळ अधिकारी आणि कोतवाल या दोन महिला कर्मचाऱ्यांना एसीबीने पकडल्याने प्रशासनातील भ्रष्टाचाराचे संकट अद्याप कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे राजापूर तालुक्याची प्रतिमा मलीन होत असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी संबंधित विभागांनी अंतर्गत नियंत्रण व्यवस्था अधिक कडक करण्याची गरज व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT