राजापूर : लांजा तालुक्यातील मौजे कुर्णे येथील राखीव वनक्षेत्रात सागवानाची मोठ्या प्रमाणावर अवैध तोड झाल्याचे उघड झाले आहे. राजापूर वन विभागाने या प्रकरणी सात संशयितांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात 31 सागवानची झाडे , अंदाजे 3.14 लाख रुपयांचा बाजारभाव असलेला माल तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली क्रेन जप्त करण्यात आल्याची माहिती असे राजापूर वन विभागाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
वन विभागाच्या माहितीनुसार, 30 ऑगस्ट 2025 रोजी लांजा तालुक्यातील कुर्णे येथील जंगल सर्व्हे नं. 191/1 मध्ये जंगल फिरती करत असताना वनपाल लांजा व वनरक्षक लांजा यांना अवैध सागवन तोड झाल्याचे निदर्शनास आले. त्यातील काही माल जागेवर मिळाला तर काही माल गायब करण्यात आल्याचे निदर्शनास आले. यानंतर भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26 (1) फ प्रमाणे गुन्हा क्र. उ03/2025 नोंदवण्यात आला. तपासानुसार, 24 सप्टेंबर 2025 रोजी मनोज संजय पाटणकर, मंदार संजय पाटणकर, अजय नागूप्रसाद निषाद, शत्रूघ्न दत्ताराम गोठणकर, विजयकुमार रामशंकर निषाद, मंदार मनमोहन बारस्कर व शुभम रवींद्र गुरव या सात संशयितांना यावेळी ताब्यात घेतले गेले.
त्यांनी सांगितले की, सागाचे झाड ट्रकमध्ये भरुन कुर्णे ते कुंभवडे येथे नेण्यात आला आणि नंतर माडबनकडे जाणार्या कसबा मिठगवाजवळील पठार येथे लपवण्यात आला. वनविभागाच्या अधिकार्यांनी ताब्यात घेतलेल्या 31 साग झाडांचा अंदाजे वजन 7.495 घ.मी. असून, बाजारभावाने त्याची किंमत अंदाजे 3,14,790 रुपये आहे. वनरक्षक लांजा यांच्याकडे सुरक्षिततेसाठी ताबा देण्यात आला आहे. तसेच, चोरीसाठी वापरलेली क्रेन क्रमांक एमएच09 जीएम 0452 देखील जप्त करण्यात आली आहे.
ही कारवाई मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर गुरुप्रसाद, विभागीय वनअधिकारी रत्नागिरी (चिपळूण) गिरिजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश सुतार, वनपाल जयराम बावदाणे, वनरक्षक विक्रम कुंभार व अन्य कर्मचारी सहभागी होते.वनविभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की अशा प्रकारच्या घटनांची माहिती मिळाल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत असल्यास टोल फ्री क्रमांक 1926 किंवा 9421741335 वर संपर्क साधावा.