Rajapur Farmer Innovation
राजापूर : कोकणातील काजू बागायतींवर सध्या खोडकिड्यांच्या वाढत्या प्रादुर्भावाचे मोठे संकट ओढवले असून अनेक बागायतदारांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. हवामानातील बदल, विविध रोगांचा प्रादुर्भाव आणि उत्पादनातील घट यामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या काजू उत्पादकांसमोर खोडकिड्यांचे संकट आणखी गंभीर बनले आहे. अशा परिस्थितीत राजापूर तालुक्यातील रायपाटण-बागवाडी येथील सचिन खोचाडे यांनी विकसित केलेली खोडकिडा निर्मूलनाची प्रभावी पद्धत बागायतदारांसाठी आशेचा किरण ठरत आहे.
मागील दहा वर्षांत कोकणात काजू लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र, परदेशातून आयात होणाऱ्या काजू बियांमुळे बाजारभावावर परिणाम होत असून शेतकऱ्यांना अपेक्षित मोबदला मिळत नाही. त्यातच बदलत्या हवामानामुळे काजू पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादनात घट होत आहे. खोडकिडा हा त्यापैकी सर्वात घातक शत्रू मानला जातो. हा किडा झाडाच्या खोडात शिरून आतील भाग पोखरतो आणि काही कालावधीत संपूर्ण झाड निकामी करून टाकतो.
रासायनिक औषधांचा वापर करूनही या किडीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविणे कठीण ठरत असताना सचिन खोचाडे यांनी आपल्या कौशल्याच्या बळावर अनेक बाधित झाडांमधील खोडकिडे यशस्वीरित्या काढून झाडांचे प्राण वाचवले आहेत. त्यांची पद्धत झाडांसाठी सुरक्षित असून त्यामुळे झाडाला कोणतीही अतिरिक्त इजा होत नाही. परिणामी बाधित झाडे पुन्हा तंदुरुस्त होऊन उत्पादनक्षम बनत आहेत.
सध्या राजापूर पूर्व विभागातील अनेक काजू बागायतदार सचिन खोचाडे यांच्याकडे मदतीसाठी धाव घेत असून त्यांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करीत आहेत. खोडकिड्यांमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या अनेक बागांना त्यांनी नवसंजीवनी दिली आहे. त्यांच्या या उपक्रमाची परिसरात जोरदार चर्चा सुरू असून कृषी क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
खोडकिड्यांच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर सचिन खोचाडे यांचे कार्य काजू बागायतदारांसाठी दिलासादायक ठरत असून त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक शेतकऱ्यांच्या बागा आणि उत्पन्न वाचण्यास मदत होत आहे.