Rajapur Pachal Teacher Couple Locked House Theft  Pudahri
रत्नागिरी

Rajapur Theft | गणपती सुट्टीत शिक्षक दाम्पत्याचे बंद घर फोडले; साडेसहा लाखांचा ऐवज लंपास

पाचल-विद्यानगर येथे घटना; फिंगरप्रिंट, श्वानपथक व फॉरेन्सिक पथकाकडून तपास

पुढारी वृत्तसेवा

Rajapur Pachal Teacher Couple Locked House Theft

राजापूर : गणपतीच्या सुट्टीत शिक्षक दाम्पत्य मूळ गावी गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने पाचल-विद्यानगर येथील त्यांच्या बंद घराचा कडी-कोयंडा तोडून सुमारे ६ लाख ५० हजार १८५ रुपयांचा ऐवज लंपास केला. घरातील लोखंडी व लाकडी कपाटांसह तिजोरी फोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरीस नेण्यात आली. या घटनेमुळे पाचल परिसरात खळबळ उडाली आहे.

पाचल येथील सरस्वती विद्या मंदिरमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या सन्नू पिरजादे आणि त्यांचे पती मुसाअल्ली गुलाब पिरजादे (वय ५६) हे तुळसवडे हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक आहेत. गणपतीच्या सुट्टीमुळे पिरजादे दाम्पत्य १२ सप्टेंबर रोजी मूळ गावी गेले होते. याच कालावधीत अज्ञात चोरट्याने त्यांच्या पाचल-विद्यानगर येथील बंद घराला लक्ष्य केले.

चोरट्याने हत्याराच्या साहाय्याने घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील लोखंडी व लाकडी कपाटे तसेच तिजोरी फोडून त्यातील मौल्यवान वस्तू चोरून नेल्या. पिरजादे दाम्पत्य घरी परतल्यानंतर घरफोडी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ राजापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

चोरीस गेलेल्या ऐवजात सुमारे साडेचार तोळे सोन्याचे घडण, सोन्याचे ब्रेसलेट, डायमंड मंगळसूत्र, डायमंड कानातील टॉप्स, सोन्याचे मंगळसूत्र, कानातले, सोन्याचा हार, कलर स्टोन्स नेकलेस, सोन्याच्या अंगठ्या, चांदीच्या पैंजणांचा जोड आणि १२ हजार रुपये रोख यांचा समावेश आहे. या सर्व ऐवजाची एकूण किंमत ६ लाख ५० हजार १८५ रुपये असल्याचे पोलिसांत दाखल फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी सुरेश कदम, राजापूरचे पोलीस निरीक्षक अमित यादव आणि पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. चोरट्यांचा माग काढण्यासाठी फिंगरप्रिंट तज्ज्ञ, श्वानपथक आणि फॉरेन्सिक पथकाची मदत घेण्यात आली.

गणपतीच्या सुट्टीत घर बंद असल्याची संधी साधून झालेल्या या घरफोडीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी राजापूर पोलिसांकडून तपास सुरू असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे करीत आहेत. याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT