आमदार किरण सामंत 
रत्नागिरी

Kiran Samant : राजापूरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही!

आमदार किरण सामंत; राजापूर शहरातील विकासकामांचा बैठकीत घेतला आढावा

पुढारी वृत्तसेवा

राजापूर : राजापूर शहराच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल आणि कोणतेही विकासकाम निधीअभावी रखडू दिले जाणार नाही, अशी ग्वाही आमदार किरण सामंत यांनी दिली. शहरातील सुरू असलेल्या, मंजूर झालेल्या तसेच प्रस्तावित विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आमदार सामंत यांनी गुरुवारी शासकीय विश्रामगृहात नगर परिषद पदाधिकारी, नगरसेवक आणि प्रशासनाची विशेष बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.

या बैठकीत शासनाच्या विविध योजनांतर्गत शहरात सुरू असलेल्या विकासकामांचा दर्जा कायम राखत ती निर्धारित मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना आमदार सामंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी नगर परिषदेच्‍या प्रस्तावित विकास आराखड्यावर चर्चा झाली. नवीन नगर परिषद प्रशासकीय इमारतीसाठी १५ कोटी रुपये, बहुउद्देशीय सभागृहासाठी ३ कोटी रुपये, मच्छी व मटण मार्केट उभारणीसाठी ३ कोटी रुपये, सफाई कर्मचारी निवासस्थान व कंपाऊंड वॉलसाठी १ कोटी रुपये, नगर परिषद मालकीच्या शाळांची दुरुस्ती, तळी स्वच्छता व उद्याने सुशोभिकरणासाठी ३ कोटींचे प्रस्ताव सादर केले. या सर्व कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि प्रस्तावित कामे लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्यासोबत बैठक घेऊन आवश्यक पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन आमदार सामंत यांनी दिले.

राजापूर शहरातील पायाभूत सुविधा, प्रशासकीय व्यवस्था, बाजारपेठ विकास, शैक्षणिक सुविधा आणि नागरी सोयीसुविधा बळकट करण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरल्याचे मानले जात आहे. या बैठकीस नगराध्यक्ष ॲड. हुस्नबानू खलिफे, उपनगराध्यक्ष विनय गुरव, काँग्रेस गटनेते ॲड. जमीर खलिफे, शिवसेना गटनेते ॲड. राहुल तांबे, मुख्याधिकारी अभिजित कुंभार तसेच सर्व नगरसेवक उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT