Accident pudhari photo
रत्नागिरी

Ratnagiri Accident : राजापूर येथे दारूवाहू टेम्पोची तीन वाहनांना धडक

दारूसाठ्यासह वाहन पोलिसांच्या ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

राजापूर : मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर येथील सीएनजी पंपासमोर दारू वाहतूक करणाऱ्या टेम्पोने तीन वाहनांना धडक दिल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. अपघातानंतर संबंधित वाहन ट्रॅक्टरच्या साहाय्याने घटनास्थळावरून हलवण्याचा प्रयत्न सुरू असताना पोलिसांनी टेम्पोसह त्यातील दारूसाठा ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या महिंद्रा पिकअप टेम्पोने राजापूर येथील सीएनजी पंपासमोर उभ्या असलेल्या तीन वाहनांना पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.मात्र, त्यानंतर अपघातग्रस्त पिकअप टेम्पो ट्रॅक्टरच्या सहाय्याने ओढत कोदवली येथील साहेबाच्या धरण रस्त्याकडे नेण्यात आल्याचे समोर आले. तेथे वाहनातील दारूचा साठा दुसऱ्या वाहनात हलवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळाली.

दरम्यान, उपसभापती अभिजीत गुरव यांना या प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी संबंधित पिकअप वाहन दारूसह ताब्यात घेतले. मात्र, ज्या दारूने भरलेल्या वाहनाने अपघात केला ते वाहन पोलिस घटनास्थळी उपस्थित असतानाही तेथून हलवण्यात कसे आले, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनांचे नुकसान झाले आहे. घटनेमुळे परिसरात मोठी चर्चा रंगली असून अवैध दारू वाहतुकीबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. राजापूर पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT