राजापूर : शहरातील लॅविश अपार्टमेंट या निवासी संकुलात दिवसाढवळ्या घरफोडी झाल्याने खळबळ उडाली आहे. शनिवारी सायंकाळी 5.30 ते 6 वा. च्या दरम्यान ही घरफोडी झाली आहे. चोरट्यांनी सुमारे 12 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची माहिती राजापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अमित यादव यांनी दिली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून आषाढी एकादशी व मोहरम एकत्र आल्यामुळे राजापूर शहरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. शहरात सर्वत्र पोलिस बंदोबस्त असतानाच ही धाडसी घरफोडी झाली आहे. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संतोष भांबुद्रे मुळ रा. बुलढाणा सध्या लॅवीश अपार्टमेंट राजापूर यांनी राजापूर पोलिसात तक्रार दिली आहे. भांबुद्रे हे गेली अनेक वर्षे राजापुरात व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले आहेत.
आठवडा बाजारात ते फळ विक्रीचा व्यवसाय करतात. काही वर्षांपूर्वी त्यांनी लॅवीश अपार्टमेंटमध्ये स्वत:चा फ्लॅट घेतला आहे. तेथे ते आपली पत्नी व मुलांसह राहतात. शनिवारी सायंकाळी पत्नी आणि मुले गाडी शिकण्यासाठी तर भाबुंद्रे नवीन घर घेण्यासाठी जागा बघण्यासाठी गेले होते. ते सांयकाळी 6.30 वाजण्याच्या दरम्यान परत आले असता त्यांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले. गेले अनेक वर्षे ते या ठिकाणी राहतात. शनिवारी सायंकाळी पती, पत्नी व मुले बाहेर गेली असल्याची संधी साधून अज्ञाताने या प्लॅटच्या दरवाजा फोडून आत प्रवेश करत चोरी केल्याने चोरटा माहितगार असल्याचे व पाळत ठेवून त्याने ही चोरी केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव, सहा. पोलीस निरिक्षक सुधीर उबाळे, श्री. शेख, सागर खंडागळे यांनी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. या घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईनकर यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली तर श्वान पथक मार्फत चोरीच्या ठिकाणी पाहणी करण्यात आली तर ठसे तज्ज्ञांकडूनही घटनास्थळाचे ठसे घेण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलीस निरिक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरिक्षक सागर खंडागळे अधिक तपास करत आहेत.
चोरट्यांनी नवीन घरासाठी ठेवलेली रोख रूपये 9 लाख व 3.80 लाखाचे दागिने असा 12 लाख 80 हजार रूपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे लक्षात आले. या प्रकरणी त्यांनी तत्काळ पोलीस ठाणे गाठून चोरीची तक्रार दाखल केली.