राजापूर : वाढत्या तापमानामुळे आणि धरणातील झपाट्याने घटलेल्या पाणी साठ्यामुळे राजापूर शहरवासीयांना यंदा तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर राजापूर नगर परिषद प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेत १५ एप्रिलपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे जाहीर केले आहे.
सध्या शहराला कोदवली येथील सायबाच्या धरणातून तसेच शीळ येथील जॅकवेलद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र, तापमानायात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे जलस्त्रोतांची पातळी झपाट्याने खालावत आहे. त्यातच धरणाच्या दुरुस्तीची कामे सुरू असल्याने उपलब्ध पाणीसाठ्यावर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे नियमित पाणीपुरवठा करणे प्रशासनासाठी कठीण ठरत आहे. या पार्श्वभूमीवर ‘एक दिवसाआड’ पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे उपलब्ध पाण्याचा नियोजनबद्ध वापर करून जास्त काळ पाणीपुरवठा टिकवता येईल, असा प्रशासनाचा विश्वास आहे.
दरम्यान, काही भागांतील पाणीपुरवठा विजेवर अवलंबून असल्याने वीजपुरवठा खंडित झाल्यास त्या भागांत अडथळे निर्माण होऊ शकतात, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. नगर परिषदेकडून नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे.