Ganeshotsav AI photo
रत्नागिरी

Ganeshotsav Ratnagiri | राजापूर तालुक्यात २५ हजार घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना

दहा सार्वजनिक मंडळांतही गणरायाची स्थापना; गणेशोत्सवासाठी बाजारपेठा सजल्या

पुढारी वृत्तसेवा

Rajapur Ganpati Festival

राजापूर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राजापूर तालुक्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, गणेश चतुर्थीच्या दिवशी तालुक्यात तब्बल २५ हजार घरगुती गणपतींची, तर १० सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. गणरायाच्या स्वागतासाठी तालुक्यातील गावागावांत जय्यत तयारी सुरू झाली असून, बाजारपेठाही सजल्या आहेत.

राजापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुमारे २० हजार घरगुती गणपतींची, तर सात सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, भटाळी, ओणी, बाळगोपाल दसूर, जय गणेश सार्वजनिक गणेश मंडळ ओझर, राजापूर एसटी आगार, विद्युत वितरण तसेच राजापूर पोलिस बॉईज आदी मंडळांच्या गणेशोत्सवाचा समावेश आहे.

नाटे पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुमारे पाच हजार घरगुती गणपतींची, तर तीन सार्वजनिक गणेशमूर्तींची स्थापना करण्यात येणार आहे. यामध्ये जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ग्रामविकास मंडळ बेनगी आणि जय गणेश मित्र मंडळ वाडापेठ या मंडळांचा समावेश आहे.

अशा प्रकारे राजापूर आणि नाटे या दोन्ही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत एकूण १० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह सुमारे २५ हजार घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना होणार असल्याने तालुक्यात गणेशोत्सवाची लगबग वाढली आहे.

दरम्यान, गणेशोत्सवासाठी राजापूर शहरासह तालुक्यातील विविध बाजारपेठा आकर्षक वस्तूंनी सजल्या आहेत. गणेशमूर्ती, सजावटीचे साहित्य, पूजेचे साहित्य, फळे-फुले तसेच अन्य वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी वाढू लागली आहे. मुंबईसह विविध शहरांमध्ये नोकरी-व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले चाकरमानीही गणेशोत्सवासाठी आपल्या गावांकडे परतू लागले आहेत. त्यामुळे गावागावांत उत्साह आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात गणरायाच्या स्वागतासाठी राजापूर तालुका सज्ज झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT