खेड : तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये पावसाच्या मुसळधार सरींचा फायदा घेत रसायनयुक्त सांडपाणी पावसाळी ओढ्यात सोडण्यात आल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गुरुवारी हिंदुस्थान कोका-कोला बेव्हरेजेस कंपनीच्या परिसरातून नाल्यात सांडपाणी वाहत असल्याचे निदर्शनास आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला असून, या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासह पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
लोटे एमआयडीसी परिसरात औद्योगिक प्रदूषणाचा प्रश्न यापूर्वीही अनेकदा चर्चेत आला आहे. पावसाळ्यात मुसळधार पाऊस सुरू असताना काही कंपन्यांकडून पावसाच्या पाण्याच्या आड रसायनयुक्त सांडपाणी बाहेर सोडले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून सातत्याने करण्यात येतो. गुरुवारीही अशाच प्रकारे कोका-कोला कंपनीच्या परिसरातून सांडपाणी नाल्यात सोडण्यात आल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला.
कंपनी परिसरातून वाहून जाणारे हे पाणी पुढे नाल्यातून जात असल्याने त्याचा परिणाम परिसरातील जलस्रोत आणि पिण्याच्या पाण्यावर होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. सांडपाण्याचा नेमका प्रकार, त्यातील रासायनिक घटक आणि त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम याची तातडीने तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकारामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले असून, संबंधित प्रशासनाने केवळ तक्रारींची नोंद न घेता प्रत्यक्ष पाहणी करून सांडपाण्याचे नमुने तपासणीसाठी घ्यावेत, अशी मागणी होत आहे. प्रदूषण नियंत्रणाच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे का, याची चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.
लोटे औद्योगिक वसाहतीतील प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याने प्रशासन आता याबाबत कोणती भूमिका घेते आणि संबंधित सांडपाण्याची तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट केली जाते का, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.