रत्नागिरी : कोकणातील पावसाचा जिल्हा अशी ओळख असलेल्या रत्नागिरीत यंदा पावसाने मोठी ओढ दिली आहे. जून ते सप्टेंबर या मुख्य पावसाळी हंगामात यंदा सुमारे २,६८२ मि.मी. पाऊस नोंदला असून या कालावधीच्या सरासरी ३,१४२ मि.मी. पर्जन्यमानाच्या तुलनेत सुमारे ४६० मि.मी. म्हणजेच १४.६ टक्के तूट राहिली आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही घट आणखी स्पष्टपणे जाणवते. २४ सप्टेंबरअखेर यंदा जिल्ह्यात २,६१६.४४ मि.मी., तर गतवर्षी याच कालावधीत ३,५९९.६७ मि.मी. पाऊस झाला होता. म्हणजेच यंदा तब्बल ९८३.२३ मि.मी. पाऊस कमी झाला आहे.
रत्नागिरी जिल्ह्याचे पर्जन्यमान सर्वसाधारणपणे ३ हजार मि.मी.पेक्षा अधिक असते. ऑगस्ट आणि विशेषतः सप्टेंबरमध्ये पावसाने मोठी विश्रांती घेतली. त्यामुळे पिकांना आवश्यक असलेल्या शेवटच्या टप्प्यात पाण्याची कमतरता निर्माण झाली.
तीन तालुके दुष्काळाच्या छायेत
जिल्ह्यातील रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर या तीन तालुक्यांचा दुष्काळग्रस्तमध्ये समावेश केला आहे. या तालुक्यांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.गतवर्षी २४ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात सरासरी ३,५९९.६७ मि.मी., म्हणजे वार्षिक सरासरीच्या सुमारे १०७ टक्के पाऊस झाला होता. यंदा याच तारखेपर्यंत २,६१६.४४ मि.मी., म्हणजे वार्षिक सरासरीच्या ७७.७७ टक्के पाऊस झाला. त्यामुळे वर्षभराच्या सरासरीच्या तुलनेतही यंदा सुमारे ७४७.७८ मि.मी.ची तूट राहिली होती.
मान्सूनने न बरसताच निम्मा महाराष्ट्र सोडला
गेल्या दहा दिवसांपासून मध्य प्रदेश, गुजरातमध्ये अडखळलेला परतीचा मान्सून अवघ्या काही तासांत महाराष्ट्रात आला. त्याने दिवसभरात ५० टक्के राज्य सोडले असून तो आता दक्षिण भारतात जाण्याच्या तयारीत आहे.यंदा १७ सप्टेंबर रोजी पश्चिम राजस्थानातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला. मात्र, तो दहा दिवस मध्य प्रदेश व गुजरातमध्येच अडखळला होता. महाराष्ट्रातून तो ५ ते ६ ऑक्टोबरदरम्यान जाईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. परंतु, सर्व अंदाज चुकवत शनिवारीच (दि. ३) मान्सून मध्य प्रदेश आणि गुजरातमधून वेगाने महाराष्ट्रात आला.