रत्नागिरी : बसस्थानकातील रिक्त असलेले व्यापारी गाळे आता स्थानिक महिला बचत गट आणि सुशिक्षित बेरोजगार तरुणांना व्यवसायासाठी देण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. सरकारच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील महिला सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार असून सुशिक्षित तरुणांना स्वतःचा रोजगार सुरू करण्यासाठी हक्काची जागा उपलब्ध होणार आहे. या नियोजनाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
ना. सरनाईक यांनी रविवारी सकाळी ११ वाजता रत्नागिरी शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाला अचानक भेट देऊन तेथील विविध सोयी-सुविधांचा सविस्तर आढावा घेतला. नवीन बसस्थानक, प्रवाशांची बसण्याची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, सीसीटीव्ही, शौचालय, कंट्रोल रूम, हिरकणी कक्ष, पोलिस चौकी, आराम निवास यासह विविध बाबींची पाहणी केली. प्रवाशांना मिळणाऱ्या सेवांची माहिती घेतली तसेच प्रशासनाला आवश्यक त्या सुधारणा करण्याचे निर्देश दिले.