रत्नागिरी : कोकणात यंदा खरीप हंगामात भात कापणी आटोपल्यानंतर जिल्ह्यात रब्बी हंगामाला वेग आला आहे. जिल्ह्यात ५ हजार ४०० हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणीचे उद्दिष्ट असून आतापर्यंत २५० हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी, दुष्काळ असल्यामुळे पेरण्या ही संथगतीने सुरू आहेत. जमिनीत शिल्लक असलेल्या ओलाव्यावर शेतकऱ्यांनी रब्बी पेरणी केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात यंदा म्हणावा तितका पाऊस झाला नाही. केवळ २ हजार ५०० मि.मी. पाऊस झाला. त्यानंतर पावसाने दांडीच मारली. त्यामुळे जिल्ह्यातील सहा तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला. खरीप हंगामातील भात, नाचणी पिके काही चांगली आली तर काही पिकांचे नुकसान झाले आहे. त्या भात पिकाची कापणी आटोपल्यानंतर कोकणातील शेतकरी रब्बी पिकाच्या पेरणीकडे वळले आहेत.
यंदा रब्बीत शेतकऱ्यांनी सर्वाधिक पसंती वाल, चवळी व कुळीथ या कडधान्य पिकांना दिली आहे. तसेच घेवडा, मूग, मोहरी यांचीही लागवड करण्यात आली आहे. भाजीपाला पिकांमध्ये भेंडी, मिरची, वांगी, काकडी, कारली, पडवळ, दुधी भोपळा, माठ यांची लागवड केली जात आहे. आजअखेर २५० हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. डिसेंबरपर्यंत रब्बी पिकाची पेरणी पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले.
रत्नागिरी जिल्ह्यात रब्बी पिकाची पेरणी सुरू झाली आहे. यंदा ५ हजार ४०० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. आजअखेर २५० हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. पावटा, कुळीथ, चवळीसह इतर पेरणी होत आहे.- शिवकुमार सदाफुले, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, रत्नागिरी