पर्ससीन नौकांची आवराआवर  
रत्नागिरी

Ratnagiri News : पर्ससीन नौकांची आवराआवर

समुद्रात वारे सुटल्याने व कमी प्रमाणात मच्छी मिळत असल्याने

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : समुद्रात वारे सुटले आहेत. त्याचबरोबर पौर्णिमेचे चांदणे असल्याने मच्छीमार नौकांना मासळी फारच कमी प्रमाणात मिळत आहेत. मासेमारीसाठी होणाऱ्या रोजच्या खर्चाइतकीही मासळी मिळत नसल्याने यावर्षी पर्ससीन नौका बंदरावर शाकारून ठेवण्याची लगबग सुरू झाली आहे. दरवर्षी मे च्या १० तारखेपासून नौका बंदरात शाकारून ठेवण्याची सुरूवात होते. परंतु आता एक आठवडा अगोदरच ५० टक्के नौकांची मासेमारी थांबली आहे. छोट्या मच्छीमार नौकांनासुद्धा समुद्रातील वारे आणि चांदण्यामुळे मासळी फारच कमी प्रमाणात मिळत आहे. परिणामी, मासळीचे दर आणखी वधारले आहेत.

पौर्णिमेच्या मागच्या-पुढच्या आठ-दहा दिवसांत मासळी स्थलांतरित होण्याचा दरवर्षीचा मच्छीमारांना अनुभव आहे. त्याचवेळी समुद्रात वारे सुटले असल्यामुळेही मासळी न मिळण्याचाही अनुभव आहे. पर्ससीन नेट नौकेमध्ये खलाशी, तांडेल आणि पागी असे ३० ते ३५ कामगार काम करतात. पर्ससीन नेट नौका समुद्रात साडेबारा नॉटिकल मैल बाहेर जावून मासेमारी करत आहेत. त्यामुळे खोल समुद्रात जाण्यासाठी आणि येण्यासाठी इंधनाचा खर्च मोठा असतो. त्याचबरोबर नौकेतील कामगारांना जेवण बनवण्यासाठी जिन्नस भरून द्यावे लागते. बर्फही मोठ्या प्रमाणात ठेवावा लागतो. त्याचवेळी याच कामगारांना आठवड्याचा पगारही द्यावा लागतो. नौकेवर कामासाठी येण्यापूर्वी या कामगारांना आगावू लाखो रुपये द्यावे लागतात.

समुद्रातील बदललेल्या वातावरणामुळे मासळी अपेक्षित प्रमाणात मिळाली नाही तर आर्थिक भुर्दंड वाढत जातो. हा खर्च टाळण्यासाठी पर्ससीन नेट नौका समुद्रात न पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात २ हजार ९६० मासेमारी नौका असून त्यातील २ हजार ५६० यांत्रिकी नौका आहेत. त्याचवेळी सुमारे २८० पर्ससीन नेट नौका असून यातील ५० टक्के नौका मासेमारीसाठी समुद्रात जात नसल्याचे मच्छिमार सचिन खेत्री यांनी सांगितले. पर्ससीन व्यक्तीरिक्त नौकांचीही अशीच अवस्था आहे. त्यांनाही फारच कमी प्रमाणात मासळी मिळत आहे. एकंदरीत यंदाचा मोसम सर्वच नौका मालकांना नुकसानीचा ठरला आहे.

मासळी पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याने रविवारी मासळीचे दरही वधारलेलेच होते. मोठ्या सुरमईचा किलोचा दर १२०० रुपयांपर्यंत होता. लहान सुरमईचा एक किलोचा दर ७०० रुपये इतका होता. लहान पापलेट ९०० ते १००० रुपये किलो दराने मिरकरवाडा बंदरावर विकली जात होती. मोठ्या पापलेटमधील उच्च प्रतीच्या बेल्डा नावाच्या पापलेटचा १ किलोचा दर १८०० रुपये इतका होता. सरंग्याचे दरही वाढलेचे होते. मोठा सरंगा ९०० रुपये तर लहान सरंगा ७०० ते ८०० रु. किलोने मिळत होता. जो बांगडा १२० रु. किलो दराने मिळणे अपेक्षित होते. त्याचा दर २०० रुपये इतका तर सौंदाळ्याचा दर ३५० रुपये इतका होता. २०० रुपये किलो दराने मिळणारे बोंबील ३०० रुपये किलो दराने विकले जात होते. कमी प्रमाणात खाल्ली जाणाऱ्या लहान कोकेरी माशाचा एक किलोचा दर ३२० रु. इतका होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT