जाकीरहुसेन पिरजादे
रत्नागिरी : पटसंख्येअभावी राज्यातील खासगी अनुदानित, अंशता अनुदानित माध्यमिक शाळांमधील हजारो शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. त्यापैकी रत्नागिरी जिल्ह्यात 263 हून अधिक शिक्षक अतिरिक्त ठरले असून 99 शाळा ही शून्य शिक्षक होणार आहेत. त्या शाळेतील शिक्षकांचे समायोजन होणार असून जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षक रिक्त, अतिरिक्त पदांची यादी हरकतीसाठी प्रसिद्ध केली आहे. लवकरच अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होणार आहे.
15 मार्च 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार संचमान्यतेचा जीआर काढला होता. मात्र निर्णयाला संस्था, शिक्षक संघटनांकडून विरोध झाला होता. अखेर न्यायालयाने या आदेशाला योग्य ठरवत अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यभरातील खासगी शाळांबरोबरच अंशता अनुदान शाळेतील समायोजनाच्या कामास सुरूवात झाली आहे. रत्नागिरी माध्यमिक शिक्षण विभागाने समायोजनासंदर्भात शाळेतील अध्यक्ष,सचिव, मुख्याध्यकांना पत्र ही पाठवले आहे. खासगी रिक्त पदांसंदर्भात हरकतीची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. तात्पुरत्या स्वरूपात यादी तयार केली असून दूरूस्ती, आक्षेपासाठी 31 मे पर्यंत मुदत दिली आहे. त्यानंतर हरकतींचे निराकरण करून अंतिम यादी तयार होईल.अंतिम यादीनंतर समायोजन जाहीर होणार असल्याचे सांगण्यात आले.
रत्नागिरी जिल्ह्यात 263 अतिरिक्त शिक्षक ठरलेले आहेत. त्यांच्या समायोजनासाठी यादी, हरकती जाहीर करण्यात आले आहे. सर्वप्रक्रिया पार पडल्यानंतर पुढील आठ दिवसांत अतिरिक्त ठरत असलेल्या शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे समायोजन होणार आहे.त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील 99 शाळा शून्य शिक्षकशाळा ठरणार असून इतर ही संख्या इतर जिल्ह्याच्या तुलनेत जास्त असण्ाार आहे.
जिल्ह्यातील खासगी, अंशत: अनुदानित शाळेतील शिक्षकामध्ये अतिरिक्त शिक्षकामुळे उर्वरित शिक्षकांच्या ही पगार झालेला नाही. वेतन थांबल्यामुळे शिक्षक अडचणीत आले आहेत. शाळामध्ये टॅब उपलब्ध नसल्यामुळे समायोजन वेळेत होवू शकले नाही. प्रक्रिया न झाल्यामुळे शाळेतील शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.