रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व वळवाच्या पावसाने आणि वादळी वाऱ्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शनिवारी रत्नागिरी शहरासह चिपळूण, लांजा, राजापूर, संगमेश्वर आदी भागांत मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटून पडल्या, घरांवरील पत्रे उडाली, तर आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे.
रत्नागिरी शहरात सायंकाळी साडेचारच्या सुमारास अचानक काळे ढग दाटून आले आणि वेगवान वाऱ्याने धुळीचे वादळ निर्माण झाले. काही वेळातच शहरभर धुळीचे साम्राज्य पसरले. मारुती मंदिर, माळनाका, साळवी स्टॉप, बाजारपेठ, बसस्थानक, जयस्तंभ, आरोग्य मंदिर परिसरात जोरदार वाऱ्यामुळे नागरिकांची मोठी धावपळ उडाली. वाहनचालकांना समोरचे दिसेनासे झाल्याने अनेकांनी वाहने रस्त्याच्या कडेला उभी करून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. काही झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्या, तर काही घरांवरील पत्रे आणि दुकानांवरील शेड्स उडाल्याच्या घटना घडल्या. सुमारे अर्धा तास हे धुळीचे वादळ सुरू होते. त्यानंतर वळवाच्या पावसाने हजेरी लावत उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा दिला.
आंबा पिकाचे नुकसान
लांजा तालुक्यातही शुक्रवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. दिवसभर कडक उन्हाने नागरिक त्रस्त झाले होते. मात्र, सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह तासभर जोरदार पाऊस कोसळला. या पावसामुळे आंबा पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे बागायतदारांकडून सांगण्यात आले.