दापोली : दापोली तालुक्यात विकासकामांचा मोठा गाजावाजा होत असताना ग्रामीण भागातील रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था या विकासाला आरसा दाखवत आहे. तालुक्यातील असंख्य ग्रामीण रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून, पावसाच्या पाण्याने हे खड्डे भरल्याने रस्ता नेमका कुठे आणि खड्डा कुठे, हेच वाहनचालकांना समजेनासे झाले आहे. त्यामुळे ‘खड्ड्यांतूनच विकासाची गंगा वाहतेय’ असे उपरोधिक चित्र सध्या तालुक्यात पाहायला मिळत आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे, ठाणे यांसह विविध शहरांतून मोठ्या संख्येने चाकरमानी आणि गणेशभक्त आपल्या गावाकडे परतत आहेत. गणरायाच्या आगमनाचा उत्साह घेऊन गावी येणाऱ्या या चाकरमान्यांचे स्वागत मात्र यंदाही खड्ड्यांनीच होत आहे. वर्षानुवर्षे गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांच्या डागडुजीची मागणी केली जाते; मात्र परिस्थितीत अपेक्षित बदल होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
तालुक्यातील प्रमुख ग्रामीण मार्गांसह अंतर्गत रस्त्यांचीही मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी डांबर पूर्णपणे उखडले असून रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. सततच्या पावसामुळे खड्ड्यांचा आकार आणखी वाढत आहे. त्यात पाणी साचल्याने खड्ड्यांची खोली लक्षात येत नसल्यामुळे वाहनचालकांसाठी हा प्रवास धोकादायक ठरत आहे.
विशेषतः दुचाकीस्वारांना याचा मोठा फटका बसत असून, खड्डे चुकविताना अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. रात्रीच्या वेळी तर पाण्याने भरलेले खड्डे दिसत नसल्याने धोका अधिकच वाढतो. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दैनंदिन प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे.
दरवर्षी गणेशोत्सवाच्या तोंडावर रस्त्यांची डागडुजी करण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र, अनेक मार्गांवरील खड्डे आजही ‘जैसे थे’ असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. एकीकडे तालुक्यात विकासकामांची चर्चा होत असताना दुसरीकडे नागरिकांना मूलभूत रस्ते सुविधेसाठी संघर्ष करावा लागत असल्याची स्थिती आहे. गणेशभक्त आणि चाकरमान्यांना यंदातरी खड्डेमुक्त प्रवास मिळणार का, की पुन्हा खड्ड्यांतूनच गणरायाचे दर्शन घेण्याची वेळ येणार? असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.