Uday Samant Pudhari
रत्नागिरी

Ratnagiri Politics: रत्‍नागिरीतील घडामोडीत आपले योगदान नाही!

विधान परिषद निवडणुकीतील सुनील तटकरेंचा दावा पालकमंत्री उदय सामंत यांनी पूर्णपणे नाकारला

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत कोकण विभाग मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांची झालेली बिनविरोध निवड सध्या संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या विजयाचे श्रेय राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांना दिले होते. मात्र, उदय सामंत यांनी सुनील तटकरेंचा हा दावा पूर्णपणे नाकारला असून, या बिनविरोध निवडीत उबाठाच्‍या उमेदवाराने उमेदवारी मागे घेण्‍यात आपले कोणतेही योगदान नसल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. यामुळे कोकणातील महायुतीच्या अंतर्गत समीकरणांबाबत नव्या चर्चांना उधाण आले आहे.

ना. सामंत यांनी या संपूर्ण घडामोडींवरून पडदा उचलताना सांगितले की, निवडणूक जागा वाटपाच्या सुरुवातीच्या चर्चेत ते स्वतः उपस्थित होते. त्यावेळी रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत सविस्तर चर्चा झाली होती. रायगडचे पालकमंत्री पद शिवसेनेच्या भरत गोगावले यांना मिळावे आणि त्या बदल्यात कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात यावी, असे ठरले होते. त्यानंतर आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनीही या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

परंतु, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार महेंद्र दळवी यांच्याशी सकारात्मक चर्चा करून जुईली दळवी यांचा अर्ज मागे घेण्यात आपण पुढाकार घेतला होता. ​सामंत यांच्या मते, महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने आणि महायुतीचे अनिकेत तटकरे यांच्यात थेट लढत झाली असती तरीही तटकरे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले असते असा ठाम विश्वास महायुतीला होता. परंतु, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी रत्नागिरीत नाट्यमय घडामोडी घडल्या. ​त्यादिवशी आपण राज्याच्या दौऱ्यावर असल्याने आपल्‍याला या स्थानिक हालचालींची अजिबात कल्पना नव्हती. अखेरच्या क्षणी महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांनी आपला अर्ज मागे घेतला, ही बातमी आपल्‍यालाही सोशल मीडियाच्या माध्यमातूनच समजली.

बाळ माने हे आपल्‍याच विधानसभा मतदारसंघातील नेते असल्याने, एवढा मोठा निर्णय घेताना आपल्याला विश्वासात घेणे किंवा पूर्वकल्पना देणे गरजेचे होते, अशी जाहीर नाराजीही सामंत यांनी व्यक्त केली. ही माहिती आपल्यापासून का लपवून ठेवली, याचे कारण आपल्याला ठाऊक नसल्याचे सांगत, त्यांनी या विजयाचे श्रेय घेण्यास नकार दिला.

राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा

दरम्‍यान, राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगली आहे. भाजप नेते आणि मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या थेट पुढाकारामुळेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बाळ माने यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. याच रणनीतीचा एक भाग म्हणून मंत्री उदय सामंत यांना या संपूर्ण राजकीय घडामोडींपासून जाणीवपूर्वक अलिप्त ठेवण्यात आले होते, अशी जोरदार चर्चा आता कोकणात सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT