सहदेव बेटकर  
रत्नागिरी

Konkan Politics : ठाकरेंचा भावी चेहराच भाजपच्या वाटेवर?

भाजप प्रवेशाच्या चर्चेमुळे ठाकरे गटात खळबळ; दापोलीतील नेतृत्वाच्या समीकरणांना नवे वळण

पुढारी वृत्तसेवा

दापोली : माजी आमदार संजय कदम यांच्या शिवसेना प्रवेशानंतर दापोली विधानसभा मतदारसंघात निर्माण झालेली संघटनात्मक पोकळी सहदेव बेटकर यांच्या माध्यमातून भरून निघेल, अशी अपेक्षा ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केली जात होती.

आगामी विधानसभा निवडणुकीत दापोली मतदारसंघातून ठाकरे गटाचा नवा चेहरा म्हणूनही बेटकर यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र आता त्यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चांमुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. पक्षफुटीनंतर रत्नागिरी जिल्ह्यात संघटना मजबूत करण्यासाठी पक्षाने बेटकर यांच्यावर जिल्हा संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी सोपवली होती. संघटनात्मक कामकाजात सक्रिय असलेल्या बेटकर यांना आगामी काळात विधानसभा उमेदवारीची संधी मिळू शकते, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सातत्याने सुरू होती. त्यामुळे अनेकांनी त्यांच्याभोवती राजकीय बांधणीही सुरू केली होती.

दरम्यान, राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांनुसार बेटकर यांनी ठाकरे गटातील जबाबदारीचा राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या हालचाली सुरू असल्याचीही चर्चा रंगली आहे. या चर्चांमध्ये तथ्य असल्यास ठाकरे गटासाठी हा केवळ एका पदाधिकाऱ्याचा राजीनामा नसून दापोलीतील संभाव्य नेतृत्वाचा चेहराच पक्षापासून दूर गेल्याचे मानले जात आहे.

विशेष म्हणजे, ज्यांच्यावर पक्षाने विश्वासाने मोठी जबाबदारी सोपवली आणि ज्यांच्याकडे भावी नेतृत्व म्हणून पाहिले जात होते, त्यांच्याच संभाव्य पक्षांतराच्या चर्चेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आता दापोली मतदारसंघात ठाकरे गटाचा पुढील चेहरा कोण असणार, याबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या दापोली विधानसभा मतदारसंघात बेटकर यांच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले असून, त्यांच्या निर्णयामुळे स्थानिक राजकारणातील समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT