रत्नागिरी : विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीतून मोठी राजकीय घडामोड घडली. महायुतीसमोरील मोठी डोकेदुखी ठरलेली बंडखोरी शमवण्यात अखेर महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांना यश आले आहे. शिंदे सेनेचे अलिबाग-मुरूडचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी (जुईकर) यांच्या वतीने त्यांच्या सूचकाने अपक्ष भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामुळे महायुतीचे अधिकृत उमेदवार अनिकेत तटकरे यांचा मार्ग आता अधिक सुकर झाला आहे. चार जून हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.
कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीत आ. दळवी यांची कन्या जुईली दळवी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे महायुतीमध्ये तीव्र अस्वस्थता पसरली होती. ही बंडखोरी पक्षांतर्गत शिस्तीला आव्हान देणारी ठरू शकते, अशी चिन्हे दिसत असतानाच पडद्यामागे वेगाने चक्रे फिरली. अखेर वरिष्ठ पातळीवरून झालेल्या यशस्वी शिष्टाईनंतर जुईली दळवी यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेण्याचा निर्णय घेतला.
आम्ही आदेशाचे पालन करतो : विकास गोगावले
उपमुख्यमंत्री व आमचे नेते एकनाथ शिंदे यांचा आदेश आल्यानंतर आम्ही बाहेर पडलो. त्यांच्या आदेशाचे पालन करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. सूचक व त्यांच्या बंधूंना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात आलो आणि अर्ज मागे घेण्याची ही प्रक्रिया पूर्ण केली. हा वाद नाही, परंतु हे राजकारण आहे. चढ-उतार होत असतो. परंतु पक्षाच्या मिटिंगमध्ये हा तोडगा निघाला आहे. भरत गोगावले यांच्या पालकमंत्री पदाचा निर्णय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे घेतील. त्याबाबत मी बोलणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांनी दिली.