पोलिस दलाचे काम अधिक प्रभावी करण्यासाठी ‘मिशन प्रगती’, ‘मिशन प्रतिसाद’ 
रत्नागिरी

Ratnagiri : पोलिस दलाचे काम अधिक प्रभावी करण्यासाठी ‘मिशन प्रगती’, ‘मिशन प्रतिसाद’

रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांची माहिती

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी ः गुन्ह्यातील फिर्यादीला गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या गुन्ह्यातील अपडेट मिळण्यासाठी ‘मिशन प्रगती’ आणि ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांसाठी ‘मिशन प्रतिसाद’ जिल्ह्यातील नागरिकांसाठी जाहीर करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 193,(3),(2) नुसार ही तरतूद करण्यात आली आहे कि, जो फिर्यादी आहे त्याला गुन्ह्याच्या तपासाची माहिती मिळावी. त्यामध्ये फिर्यादीला घटनास्थळाचा पंचनामा, आरोपीची अटक अशी प्रत्येक अपडेट मेसेज,व्हॉटसअ‍ॅपव्दारे देण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे फोन नसेल त्यांना पत्राव्दारे गुन्ह्याचा अपडेट देण्यात येणार आहे. काही वेळा फिर्यादीला मंडणगड सारख्या दुर्गम भागातून गुन्ह्यांच्या तपासाची माहिती घेण्यासाठी यावे लागते. त्यांचा हा त्रास थांबावा यासाठी मिशन प्रगती सुरु करण्यात येत आहे. जेणेकरुन पोलिस विभाग हा समाजाचा बांधिल आहे असा संदेश नागरिकांपर्यंत पोहचला पाहिजे.

त्याचप्रमाणे ‘मिशन प्रतिसाद’ मध्ये यापूर्वी सर्व जिल्ह्यांमध्ये ज्येष्ठ नागरिक सहाय्यता कक्ष स्थापन करण्यात आले होते. परंतु ते काम कुठेतरी यशस्वी होण्यास थोडे कमी पडले, त्यामुळे आता ज्येष्ठ नागरिकांना वैद्यकिय सेवा, त्यांची काही तक्रार असेल, त्यांना घरातून मारहाण होत असेल, कोणी फसवणूक केली असेल तर त्यांच्या मदतीसाठी 24 तास दोन हेल्पलाईन नंबर ठेवण्यात आले आहेत. ते फोन घेण्यासाठी अंमलदार व अधिकार्यांची नेमणूक करण्यात आली असून जेष्ठ नागरिकांच्या तक्रारीनुसार,पोलिस कर्मचारी तातडीने त्यांच्या मदतीसाठी ते जिथे कुठे असतील तिथे जातील. त्यांना हवी ती मदत करतील तसेच त्यांची जी समस्या होती त्यावर पोलिसांनी कशी मदत करुन ती समस्या सोडवली त्याचा फोटो संबंधित यंत्रणेकडे पाठवून त्याचा पूर्ण पाठपुरावा करण्यात येणार आहे. या साठी पथके तयार करण्यात आली असून या दोन्ही मिशनचे मॉनिटरिंग जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातून होणार असल्याची माहितीही पोलिस अधीक्षकांनी यावेळी दिली.

या पत्रकार परिषदेत अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून 100 दिवस कार्यक्रमानंतर आता 150 दिवस कार्यक्रमाची माहिती दिली. त्यामध्ये ‘ई प्रशासन सुधारणा’ कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. पोलिस विभागाकडून आपले सरकार पोर्टलव्दारे एकूण 17 सेवा दिल्या जातात. मात्र याची नागरिकांमध्ये जागृकता कमी आहे.नागरिक यातील ठराविक सेवांसाठी अर्ज करतात आणि सेवांसाठी पोलिस ठाण्यांच्या फेर्‍या मारत बसतात. नारिकांना या इतर सेवा घरबसल्या मिळाव्यात यासाठी सर्व शासकिय,खासगी,निम शासकिय आस्थापनांना सूचना देण्यात आल्या आहेत.सर्वात जास्त चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रासाठी नागरिक त्रस्त होत आहेत.सर्व आस्थापनांना ही विनंती आहे कि त्यांनी संबंधित वेबसाईटवर अर्ज करावा त्याचा क्युआर कोड रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाच्या वेबसाईवर दिला आहे.या सर्व ऑनलाईन अर्जांची पडताळणी केवळ 3 दिवसात पूर्ण होत असल्याची माहिती दिली.

‘मिशन प्रतिसाद’साठी 24 तास सेवा

यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी 9684708316 आणि 8390929100 हे हेल्पलाईन नं सुरू करण्यात आले असून त्यासाठी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकांकडून ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न सोडवून त्याचा पूर्ण पाठपुरावा करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT