Crime News Pudhari
रत्नागिरी

Ratnagiri theft : डिझेल चोरीचा उलगडा; टोळी पोलिसांच्या रडारवर

दापोलीतील दुर्गम भागातील एसटी फेऱ्यांवर परिणाम; सेवा बंद करण्याची प्रशासनावर वेळ

पुढारी वृत्तसेवा

प्रवीण शिंदे

दापोली : तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या दीड वर्षांपासून सुरू असलेल्या एसटी बसमधील डिझेल चोरीच्या मालिकेचा अखेर उलगडा होऊ लागला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे एका चोरट्याला रंगेहाथ पकडण्यात यश आले असले, तरी या प्रकरणामागील संपूर्ण टोळी अजूनही पोलिसांच्या रडारवर असल्याने प्रकरण अधिक गडद बनले आहे.

तालुक्यातील दुर्गम वस्तीवर धावणाऱ्या एसटी बसमधून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत डिझेल लंपास करण्याचे प्रकार सातत्याने घडत होते. अनेकदा बसमधील डिझेल संपल्याने गाड्या रस्त्यातच बंद पडत होत्या. याचा थेट फटका शाळकरी विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक आणि ग्रामस्थांना बसत होता. काही दुर्गम भागातील फेऱ्यांवर परिणाम होऊन सेवा बंद करण्याची वेळही प्रशासनावर आली होती. या प्रकारामुळे सुरुवातीला स्थानिक वाहनधारक व ग्रामस्थांवर संशय घेत पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. मात्र ठोस पुरावे न मिळाल्याने आरोपी दीर्घकाळ पोलिसांच्या हाती लागत नव्हते. अखेर भडवळे परिसरात एसटी कर्मचाऱ्यांनी रचलेल्या सापळ्यात एक संशयित अडकला आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

पोलिसांनी आरोपीकडून गावठी बनावटीची बंदूक जप्त केली आहे. चोरी करताना पकड टाळण्यासाठी हल्ल्याची तयारी ठेवली जात असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हा प्रकार केवळ किरकोळ चोरीपुरता मर्यादित नसून संघटित गुन्हेगारीचे स्वरूप असल्याचे समोर येत आहे. प्राथमिक तपासात आरोपीकडून हजारो लिटर डिझेलची चोरी झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. चोरीचे डिझेल नेमके कुठे आणि कोणाच्या माध्यमातून विकले जात होते, याचा तपास सुरू असून या जाळ्यामागील इतर साथीदारांचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले आहे. दरम्यान, या चोरीचा आर्थिक फटका एसटी चालक व वाहकांना बसत होता. चोरीस गेलेले डिझेल स्वतःच्या खिशातून भरावे लागत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी होती. या कारवाईनंतर त्यांना दिलासा मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकूणच या प्रकरणाने ग्रामीण भागातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आणला असून उर्वरित आरोपींना अटक करून संपूर्ण जाळे उघडकीस आणण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT