चोरट्यांना १५ कि.मी. पाठलाग करून पकडले 
रत्नागिरी

Ratnagiri Crime : चोरट्यांना १५ कि.मी. पाठलाग करून पकडले

रिंगणे-गांगोवाडीत घरफोडीचा डाव; नागरिकांच्या धाडसाने दोघेजण जेरबंद

पुढारी वृत्तसेवा

लांजा : घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत भरवस्तीत असलेल्या बंद घराचा कडी-कोयंडा तोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन चोरट्यांना ग्रामस्थांनी तब्बल १५ किलोमीटर पाठलाग करून पकडले. लांजा तालुक्यातील रिंगणे-गांगोवाडी येथे शनिवारी दुपारी घडलेल्या या थरारक घटनेत ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे घरफोडीचा डाव उधळला गेला.

दरम्यान, लांजा पोलिसांनी दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सुमारे ७० हजार रुपये किंमतीच्‍या दुचाकीसह घरफोडीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले. संजय ऊर्फ मोहन निकाजा भोसले (२१) आणि नितेश ऊर्फ संतोष मरदान भोसले (२५, दोघेही रा. कासारी, ता. आष्टी, जि. बीड) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. रिंगणे-गांगोवाडीतील संतोष श्रीधर आयरे हे कामानिमित्त मुंबईतील कुर्ला येथे वास्तव्यास आहेत. त्यांचे रस्त्यालगत भरवस्तीत बंद घर आहे. शनिवारी दुपारी ३.३०च्या सुमारास दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्या घराच्या अंगणात शिरल्या. त्यांनी दर्शनी दरवाजाचा कडी-कोयंडा पाना व अन्य साहित्याच्या सहाय्याने तोडण्यास सुरुवात केली. हा प्रकार शेजारील नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी आरडाओरडा केला.

ग्रामस्थ जमा होत असल्याचे लक्षात येताच दोन्ही चोरट्यांनी नंबरप्लेट नसलेल्या होंडा शाईन दुचाकीवरून राजापूर तालुक्यातील कारवलीच्या दिशेने पलायन केले. मात्र, रिंगणेचे सरपंच संजय आयरे, कोंडगेतील सामाजिक कार्यकर्ते महेश विश्वासराव आणि कुरंग येथील गणेश सुर्वे यांनी तत्काळ वाहनाने त्यांचा पाठलाग सुरू केला. तब्बल १५ किलोमीटर पाठलाग केल्यानंतर कारवली येथे त्यांनी दोन्ही संशयितांना पकडले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच लांजा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संशयितांची झडती घेतली असता त्यांच्याकडून नंबरप्लेट नसलेली सुमारे ७० हजार रुपये किंमतीची काळ्या रंगाची होंडा शाईन दुचाकी, मोठा पोपट पाना, स्क्रू ड्रायव्हर, लोखंडी सुरा, कटर, हॅन्ड ग्लोव्हज, मास्क आणि ओळखपत्र असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात नितेश भोसले याच्यावर सांगली जिल्ह्यातील शिराळा व इस्लामपूर पोलिस ठाण्यात यापूर्वी गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. दोन्ही संशयितांविरुद्ध लांजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल शेलार करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT