घरफोडी www.pudhari.news 
रत्नागिरी

Ratnagiri Crime : घरफोडी करणार्‍या चोरट्याला दोन तासांतच पडल्या बेड्या!

साडेचार लाखांचे दागिने हस्तगत; चिपळूण पोलिसांची कामगिरी

पुढारी वृत्तसेवा

चिपळूण : चिपळूण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मार्गताम्हाणे, गोपाळवाडी येथे घरफोडी करून चोरी करणार्‍या आरोपीचा चिपळूण पोलिसांनी अवघ्या दोन तासांत छडा लावत त्याला ताब्यात घेतले. आरोपीकडून चोरीस गेलेला तब्बल 4 लाख 45 हजार 842 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत शैला दिलीप तावडे (मार्गताम्हाणे, गोपाळवाडी) यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

मार्गताम्हाणे गोपाळवाडी येथील तावडे यांच्या घरात अज्ञात इसमाने प्रवेश करून चोरी केल्याची घटना घडली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण पोलिस ठाण्याच्या पथकाने तपास सुरू केला. आणि अवघ्या दोन तासात चोरट्याच्या मुसक्या आवळून जेरबंद केले. या प्रकरणी आरोपी नितेश अंकुश साबळे (31) याला अटक केली आहे.

पोलिसांनी गोपनीय माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली. त्यानंतर अवघ्या दोन तासांत गुन्ह्याचा उलगडा करत संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. आरोपीच्या ताब्यातून चोरीस गेलेला 4 लाख 45 हजार 842 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई चिपळूण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT