Dam Water Storage 
रत्नागिरी

Ratnagiri News : गुलाबी थंडीने जलसाठ्यांतील बाष्पीभवनाचा वेग मंदावला!

धरणांतील पाणीसाठ्याला फायदा होणार; पाणीसाठा टिकून राहण्‍यास मदत, तापमानाचा पारा खाली घसरतोय

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : कोकण किनारपट्टीवर गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला असून तापमानाचा पारा झपाट्याने खाली घसरत आहे. या बदलत्या हवामानाचा सकारात्मक परिणाम रत्‍नागिरी जिल्ह्यातील जलस्रोतांवर दिसून येत आहे. हवेतील गारवा वाढल्यामुळे धरणे, तलाव आणि अन्य जलसाठ्यांमधील पाण्याच्या बाष्पीभवनाची प्रक्रिया मंदावली असून पाणीसाठा टिकून राहण्यास मदत होत आहे.

जिल्‍ह्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे भीषण पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. यंदा पाणीसाठ्याची स्थिती चिंताजनक असून त्यात आणखी घट झाल्यास आगामी काळात पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. बाष्पीभवन वाढल्यास पाणीसाठा आणखी कमी होण्याचा धोका असतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून जिल्‍ह्याचे तापमान १९ ते २० अंशांवर आले आहे. थंडी वाढल्याने तापमानाचा पारा घसरू लागला आहे. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जिल्ह्यातील काही भागांत दरवर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यापासून पाण्याच्या झळा बसण्यास सुरुवात होते. मात्र, यंदा पाऊस कमी पडल्याने आणि त्‍यातच तापमान ४ ते ५ अंश सेल्‍सिअसने वाढल्‍याने बाष्पिभवनाचा वेग वाढला आहे. त्‍यामुळे यंदा पाणी टंचाई लवकर जाणवणार, अशी परिस्‍थिती आहे. मात्र काही दिवसापासून तापमानात घट होवू लागल्‍याने थंडी वाढल्याने बाष्पीभवनाचा वेग कमी होण्याची शक्यता आहे. त्‍यामुळे जिल्‍ह्यातील प्रमुख धरणांमधील उपयुक्‍त पाणीसाठा काही दिवस टिकून राहण्यास मोठी मदत होणार आहे.

पाण्याचा वापर काटकसरीने करा

पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा. पाण्याचा अपव्यय टाळून उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. आगामी काळात पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी आतापासूनच पाण्याचा जपून वापर करणे गरजेचे आहे, असे आवाहन करण्‍यात आले आहे.

इतका आहे पाणीसाठा

रत्‍नागिरी जिल्‍ह्यातील नातूवाडी, गडनदी आणि अर्जुना या तीन मध्यम प्रकल्‍पांमध्ये आतापर्यंत १६२.३ दशलक्ष घनमीटर ९१ टक्‍के पाणीसाठा आहे. तर ५० लघु प्रकल्‍पांमध्ये १५२.३ दशलक्ष घनमीटर म्‍हणजेच ६४.८७ टक्‍के पाणीसाठा आहे. तर गेल्‍यावर्षी तीन मध्यम प्रकल्‍पांमध्ये १६६ दशलक्ष घनमीटर ९३ टक्‍के पाणीसाठा आणि लघु प्रकल्‍पांमध्ये १६१ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा ६७ टक्‍के होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT