रत्नागिरी : सातार्यातील फलटण येथील महिला वैद्यकीय अधिकारी आत्महत्या प्रकरण सध्या राज्यभर गाजत आहे. राजकीय पुढाकार्यांच्या मानसिक छळाला कंटाळून हा प्रकार केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. याच धरतीवर रत्नागिरीत असा प्रकार घडण्याची शक्यता होती. परंतु एका आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी महिलेने राजीनामा देत घरचा रस्ता पकडला. यामुळे हा प्रकार रत्नागिरी जिल्ह्यात होता होता वाचला.
गतमहिन्यात संगमेश्वर तालुक्यातील धामापूर तर्फे देवरुख या आरोग्य केंद्रातील एका महिला वैद्यकीय अधिकारीने अचानक राजीनामा दिला होता. या वैद्यकीय अधिकारीने राजीनामा का दिला उलटसुलट चर्चा सुरु झाली. विशेष म्हणजे महिला अधिकारी यांची आरोग्य सेवा उत्तम होती. त्यांचा जनसंपर्क सुद्धा तेवढाच चांगला होता. यामुळे परिसरातील ग्रामस्थांना त्यांचा राजीनामा जिव्हाळी लागला. शेवटी ग्रामस्थांनी विशेष सभा बोलविली. यावेळी या सभेला वैद्यकीय अधिकारींना बोलवून राजीनाम्यामागचं कारण जाणून घेतलं. या महिला डॉक्टरांच्या राजीनाम्याच कारण ऐकून उपस्थित ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. कारण एक राजकीय पुढारी आपल्याला मानसिक त्रास देत असल्याचे या महिला डॉक्टरांनी सांगितले.
मुळात हा राजकीय पुढारी नेहमीच चमकेगिरी करत असतो. प्रत्येक कार्यक्रमात तो पुढे पुढे असतो. वास्तविक या आरोग्य केंद्राशी या राजकीय पुढार्याचा काहीही संबंध नव्हता. त्यांनी असे का केले याबाबत सध्या उलटसुलट चर्चा सुरु आहे. संबंधित राजकीय पुढार्याला ग्रामस्थांनी त्वरित या बैठकीला बोलावले. तो उपस्थितही झाला. त्याने आपली चूक मान्य करत त्या महिला डॉक्टरची माफी सुद्धा मागितली. त्यामुळे या प्रकारावर पडदा पडला असे वाटत होते. त्या महिला डॉक्टरने राजीनामा मागे सुद्धा घेतला होता.
या नाट्यमय घडामोडीनंतरसुद्धा या सामाजिक कार्यकर्ता असे म्हणणार्या या राजकीय पुढार्याने अप्रत्यक्षरीत्या त्या महिला डॉक्टरला त्रास देण्यास सुरुवात केली. शेवटी या मानसिक त्रासाला कंटाळून या महिला डॉक्टरने राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. एकतर खेडेगावात शासकीय रुग्णालयामध्ये डॉक्टर येत नाहीत. जिल्ह्यात आजही आरोग्य केंद्रात डॉक्टरांची अनेक पदे रिक्त आहेत. असे असताना राजकीय पुढार्यांक़डून मानसिक त्रास झाला तर कोण येणार? असा सवाल उपस्थित होत आहे.