पावस : अमेरिका-इराण तणावामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधन दरवाढीची शक्यता निर्माण झाली असून पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या वाढत्या किमतींचा परिणाम पर्यटन क्षेत्रावर होण्याची चर्चा सुरू आहे. मात्र, या पार्श्वभूमीवरही कोकणातील धार्मिक पर्यटनाला कोणताही फटका बसलेला नसल्याचे चित्र पावस येथे पाहायला मिळत आहे.
एप्रिल व मे या दीड महिन्याच्या सुट्टीच्या कालावधीत पावस येथे स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर परिसरात तब्बल १ लाख ३० हजार पर्यटक, भाविकांनी भेट दिली असून, त्यापैकी सुमारे ६० हजार पर्यटकांनी मंदिराच्या भक्तनिवासात मुक्काम केला आहे.
उन्हाळी सुट्ट्यांमध्ये शहरांतील कुटुंबे मोठ्या प्रमाणावर कोकण किनारपट्टीकडे वळत आहेत. धार्मिक पर्यटनासोबतच समुद्रकिनारे, निसर्गरम्य परिसर आणि शांत वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम पावस परिसरातील पर्यटन आणि स्थानिक व्यवसायांवरही होताना दिसत आहे. शनिवार, रविवार तसेच सलग सुट्ट्यांच्या दिवशी मंदिर परिसरात मोठी गर्दी होत असून भक्तनिवासही अनेकदा पूर्ण क्षमतेने भरत आहे
भाविकांसाठी ड्रेस कोड सक्तीचा....
दरम्यान, समाधी मंदिर प्रशासनाकडून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेसकोडचे नियम काटेकोरपणे पाळले जात आहेत. पूर्ण वस्त्र परिधान केलेल्या भाविकांनाच मंदिरात प्रवेश दिला जातो. कमी कपड्यांमध्ये आलेल्या पर्यटकांना मंदिर प्रशासनाकडून वस्त्र उपलब्ध करून दिल्यानंतरच दर्शनासाठी प्रवेश दिला जात असल्याची माहिती सुरक्षारक्षकांनी दिली. त्यामुळे भाविकांची गैरसोय टळत असून मंदिर परिसरातील शिस्त आणि पवित्रताही कायम राखली जात आहे.