पावसमध्ये ठाकरे-शिंदे शिवसेना लढत 
रत्नागिरी

Pawas ZP Election : पावसमध्ये ठाकरे-शिंदे शिवसेना लढत

दोन्ही पक्षांच्या अस्तित्वाचा प्रश्न; भाजप कोणाच्या बाजूने राहणार यावर अवलंबून

पुढारी वृत्तसेवा

पावस : स्वर्गीय कुसुमताई अभ्यंकर यांच्या आमदारकीच्या कारकीर्दीपासून भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या पावस जिल्हा परिषद गटामध्ये महायुतीच्या माध्यमातून उमेदवारी न मिळाल्यामुळे या गटांमध्ये ठाकरे शिवसेना विरुद्ध शिंदे शिवसेना अशी रंगतदार लढत होणार आहे. या निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे भाजपा कार्यकर्ते शेवटपर्यंत कोणाच्या बाजूने राहणार यावर सर्व गणिते अवलंब जाणार आहेत.

पावस जिल्हा परिषद गट पारंपरिक भाजपचा बालेकिल्ला आहे हे त्यांच्या कार्यकर्त्यांनी सातत्याने दाखवून दिले आहे. त्यानंतर शिवसेनेची युती झाल्यानंतर हा बालेकिल्ला आणखी मजबूत झाला, परंतु स्थानिक पातळीवरती मतभेद असल्याने कालांतराने दोघांची कागदोपत्री युती प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात संघर्ष त्यानंतर या दोघांमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली. त्यावेळी भाजपाने आपले वर्चस्व सिद्ध केले, परंतु त्यानंतर आमदार उदय सामंत यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर शिवसेनेचे प्राबल्य मोठ्या प्रमाणात वाढले. त्यानंतर शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर ठाकरे गट व शिंदे गट असे शिवसेनेचे विभाजन झाले. यामध्ये अनेकांनी शिंदे गटांमध्ये प्रवेश केल्यामुळे शिंदे गटाचे प्राबल्य मोठ्या प्रमाणात वाढले. त्यामुळे या जिल्हा परिषद गटातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये शिंदे गटाने आपले प्राबल्य मिळवले. यामध्ये भाजपची काही प्रमाणात घसरण झाली. मात्र पक्षाने आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती झाल्यामुळे शिंदे गट व भाजप यांनी आपल्यातील अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून पक्षाचे काम केल्यामुळे दोन्ही निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार विजयी झाला. त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये महायुतीची सत्ता मिळवण्याच्या दृष्टिकोनातून वरिष्ठ पातळीवरून महायुती झाल्यामुळे जिल्ह्यामध्ये महायुती झाली. मात्र रत्नागिरी तालुक्यामध्ये बालेकिल्ला असलेल्या पावसमध्ये भाजपला उमेदवारी न मिळाल्यामुळे प्रचंड नाराजी निर्माण झाली होती, परंतु वरिष्ठ पातळीवरून समजूत घातल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या दृष्टिकोनातून हालचाली सुरू केल्या आणि अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यातील या गटातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती करण्यात आली असून ग्रामपंचायत निवडणुका हे दोन्ही पक्ष महायुतीच्या माध्यमातून लढवण्याच्या दृष्टिकोनातून लोकसभा विधानसभा निवडणुकीपाठोपाठ जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये प्रचार यंत्रणा राबवली जात असून काही दिवसावर येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तीच नीती अवलंबली जाण्याची शक्यता सध्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिसून येत आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते प्रचाराच्या कामाला लागल्याचे चित्र दिसत आहे.

गेल्या पाच वर्षांमध्ये आमदार उदय सामंत यांच्या माध्यमातून या जिल्हा परिषद गटामध्ये मोठ्या प्रमाणात विकास निधी आल्यामुळे या भागांमध्ये विकास कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. ही विकास कामे आणखी वाढावीत याकरिता प्रचार यंत्रणेवरती भर दिला जात असून विकास कामांवरती ही निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवली जात आहे. त्याला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

ठाकरे गटाचे पावस विभाग प्रमुख रविकिरण तोडणकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून मोठ्या प्रमाणात प्रचार यंत्रणा राबवली जात असून गेली पंधरा वर्षे या गटामध्ये विभाग प्रमुखांची जबाबदारी पार पडत असताना मोठ्या प्रमाणात जनसंपर्क असल्यामुळे व त्या गतीने विकासकामे केल्यामुळे त्यांचेही विकास कामांकडे जास्त लक्ष असून ती लोकांपर्यंत पोहोचवण्याची कामे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केली जात आहेत. तसेच 2012 ते 17 यादरम्यान आरती तोडणकर यांनी या गटांमध्ये मोठ्याप्रमाणात विकास कामे केल्यामुळे त्याचा फायदा या निवडणुकीमध्ये रविकिरण तोडणकर यांना होणार असल्याचे कार्यकर्त्यांमध्ये बोलले जात आहे. त्यामुळे या जिल्हा परिषद गटामध्ये ठाकरे गट विरुद्ध महायुती असा थेट सामना होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT