पावस येथील गौतमी नदीवरील पूल 
रत्नागिरी

Ratnagiri News : पावस येथील गौतमी नदीवरील नव्या पुलाचे गर्डर चढवण्याचे काम वेगात

महिनाभरात पुलाचे मुख्य काम पूर्णत्वास जाण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

पावस : रत्नागिरी–राजापूर सागरी मार्गावरील पावस येथील गौतमी नदीवर नव्याने उभारण्यात येणाऱ्या पुलाच्या गर्डर चढवण्याच्या कामाला वेग आला आहे. सध्या दोन क्रेनच्या सहाय्याने पिलरवर गर्डर बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून येत्या महिनाभरात पुलाचे मुख्य काम पूर्णत्वास जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, सर्व पूरक कामे पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष वाहतूक दिवाळीनंतर सुरू होण्याची शक्यता आहे.

या पुलासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री उदस सामंत यांच्या विशेष प्रयत्नांतून सुमारे 8 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सुमारे 50 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला जुना पूल जीर्ण अवस्थेत असून भविष्यात तो धोकादायक ठरण्याची शक्यता लक्षात घेता नव्या पुलाच्या उभारणीचा निर्णय घेण्यात आला.नोव्हेंबर महिन्यात या कामाला सुरुवात करण्यात आली. भूमिपूजनानंतर लगेचच झालेल्या अवकाळी पावसामुळे सुरुवातीला अडथळे निर्माण झाले होते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याच्या उद्देशाने ठेकेदाराने कामाचा वेग वाढवला. आतापर्यंत तीन पिलरचे काम पूर्ण झाले असून त्यावर बसवण्यासाठी लागणारे गर्डर त्याच ठिकाणी तयार करण्यात आले आहेत.पिलर पूर्ण झाल्यानंतर आता या तिन्ही पिलरवर गर्डर चढवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. दोन मोठ्या क्रेनच्या साहाय्याने हे काम केले जात असून त्यामुळे कामाची गती चांगलीच वाढली आहे.

पुढील टप्प्यात पुलाच्या दोन्ही बाजूंनी भराव टाकण्याचे काम पूर्ण झाल्यास पावसाळ्यापूर्वी प्राथमिक स्वरूपात वाहतूक सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.तथापि, काही पूरक कामे अद्याप बाकी असल्याने पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू होण्यासाठी दिवाळीपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते. दरम्यान, पावसाळा लवकर सुरू झाल्यास बांधकामावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.एकूणच, सध्या सुरू असलेल्या कामाचा वेग लक्षात घेता हा पूल निर्धारित वेळेत पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्‍त केली जात असून या पुलामुळे सागरी मार्गावरील वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT