रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात पररजिल्ह्यातून नोकरी, व्यवसाय व कामासाठी आलेल्या चाकरमान्यांना दिवाळीला गावी जाण्यासाठी रत्नागिरी विभागातर्फे दररोज 21 एसटी बसेसच्या फेर्यांचे नियोजन करण्यात आले आहे. 11 दिवसांत तब्बल 250 जादा फेर्यांचे नियोजन झाले आहे. बहुतांश चाकरमान्यांनी गावी जाण्यासाठी लालपरीलाच पहिली पसंती दिली आहे ऑनलाईन तिकीट काढण्यात येत आहे. 16 ते 26 ऑक्टोबरपर्यंत जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.
दिवाळी सण सर्वात मोठा सण असून अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे आता नागरिकांकडून बाजारात खरेदी करण्यास सुरूवात झाली आहे. दिवाळीसाठी चाकरमानी हमखास आपल्या गावी जातोच. शाळेच्या परीक्षा सुरू असून परीक्षा झाल्यानंतर मामाच्या गावी, मूळ गावी जाण्यासाठी सर्वांचीच लगबग असते. 16 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरपर्यंत दिवाळीसुट्ट्या असणार आहेत.
प्रवाशांचा प्रवास चांगला, सुखकर होण्यासाठी रत्नागिरी विभागाच्या वतीने जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. दररोज 21 फेर्या अशा तब्बल 250 हून अधिक बसेस सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे दिवाळीनिमित्त होणारी गर्दी लक्षात घेवून कित्येक जण ऑनलाईन तिकीट काढतात व आपली सीट आरक्षित करतात. आतापर्यंत कित्येक जणांनी आपले तिकीट आरक्षित केले असून, एसटी बकिंगसाठी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ज्यांनी तिकीट काढले नाही, त्यांनी तिकीट काढावे असेही आवाहन करण्यात आले.
रत्नागिरी विभागातील लाल परी पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, तर विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, बुलढाणा या जिल्ह्यांतही धावणार आहे.
दिवाळीनिमित्त रत्नागिरी विभागाच्या वतीने जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त प्रवाशांनी तिकीट बुकिंग करून घ्यावे. तसेच 65 वर्षांवरील ज्येष्ठांना, महिला, तरूणींना तिकिटात 50 टक्के सवलत, तर 75 वर्षांपुढील ज्येष्ठांना मोफत प्रवास असणार आहे.-प्रज्ञेश बोरसे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी