Crime pudhari
रत्नागिरी

Ratnagiri Crime : पार्किंगच्या वादातून तिघांना मारहाण; कारची काच फोडली

दापोली शहरातील केळस्कर नाका परिसरात

पुढारी वृत्तसेवा

जालगाव : दापोली शहरातील केळस्कर नाका परिसरात पार्किंगच्या किरकोळ वादातून तिघांना मारहाण करून कारची काच फोडल्याची घटना घडली असून, याप्रकरणी दापोली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक दत्ताराम शेडगे हे कुटुंबासह मूळ गावी आले होते. १५ मे रोजी सकाळी ते नातेवाईकांसोबत मारुती सुझुकी बलेनो कारमधून दापोली बाजारपेठेत घरगुती साहित्य खरेदीसाठी गेले होते. केळस्कर नाका येथे वाहतूक कोंडी झाल्याने त्यांनी वाहन रस्त्याच्या कडेला उभे केले. त्यावेळी राँग साईडला उभ्या असलेल्या एका छोट्या टेम्पो चालकाला वाहन व्यवस्थित लावण्यास सांगितल्याने दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद झाला. त्यानंतर संबंधित सर्वजण तेथून निघून गेले.

मात्र दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास मच्छीमार्केट रोडवरील सावंत बिल्डिंगसमोर उभ्या असलेल्या शेडगे यांच्या वाहनाजवळ सहा ते सात जण मोटारसायकलींवरून आले. त्यांनी गाडीत बसलेल्या नातेवाईकांना बाहेर ओढून मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. यावेळी एका व्यक्तीने बिअरची बाटली डोक्यात मारून दुखापत केली, तर दुसऱ्याने दगड मारून बलेनो कारची पुढील काच फोडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या मारहाणीत प्रवीण प्रताप जेधे आणि स्वप्निल मारुती शेडगे हेही जखमी झाले असून, त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.या प्रकरणी दीपक शेडगे यांनी आफ्रिदी अहमद जोगिलकर, अझर अहमद जोगिलकर, अलताफ अल्लाउद्दीन आलम (सर्व रा. खोंडा, दापोली) तसेच अन्य चार जणांविरोधात मारहाण, शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी आणि वाहनाचे नुकसान केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजकुमार यादव करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT