रत्नागिरी : वन विभाग आणि महावितरणच्या भोंगळ कारभारावर शुक्रवारी रत्नागिरी पंचायत समितीच्या सभेत सदस्यांनी जोरदार संताप व्यक्त केला. पकडलेले बिबटे नेमके कुठे सोडले जातात, या प्रश्नावर वन अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या सभापती आणि सदस्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. दुसरीकडे, नाणीज येथील एका वीज ग्राहकाला आधी एक लाख आणि त्यानंतर तब्बल पाच लाख रुपयांचे बिल आल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावर ग्राहकाने आमच्याकडे तक्रार केली का, असा उलट सवाल महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केल्याने सभागृहात संतापाची लाट उसळली.
रत्नागिरी पंचायत समितीची सभा सभापती प्रवीण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली, तर उपसभापती गजानन धनावडे यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी सर्व सदस्य आणि खातेप्रमुख उपस्थित होते. यावेळी सभापती प्रवीण पांचाळ यांनी रानपाट येथील बिबट्या पकडून जाकादेवी येथे सोडण्यात आला होता का, अशी विचारणा केली. मात्र, याबाबतची माहिती देता येणार नसल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले. यावर सभापती संतप्त झाले. ग्रामीण भागात बिबट्यांकडून पाळीव प्राण्यांवर हल्ले होत आहेत. या प्राण्यांवर अवलंबून असलेल्या कुटुंबांचे नुकसान होते, त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होत आहे. नुकसानभरपाईही वेळेत मिळत नाही. मग यावर उपाययोजना काय, असा सवाल त्यांनी केला.
त्यावर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी, 'तुम्ही सर्व सदस्य यामध्ये तज्ज्ञ आहात. तुम्हीच यावर मार्गदर्शन करा,' असे उत्तर दिले. अधिकाऱ्यांच्या या उत्तराने सभागृहातील सदस्य अवाक झाले. वन विभागाचे अधिकारी तुम्ही आहात की आम्ही? उपाययोजना तुम्ही सांगायला हव्यात. तुम्ही धन्य आहात, जागेवर बसा, अशा शब्दांत सभापती पांचाळ यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.
पाच लाखांचे बिल, महावितरणची जबाबदारी कोणाची?
महावितरणच्या आढाव्यावेळी सदस्य वैभव पाटील यांनी नाणीज येथे एका ग्राहकाला आलेल्या अवाढव्य बिलाचा मुद्दा उपस्थित केला. संबंधित ग्राहकाला पहिल्या महिन्यात एक लाख रुपये, तर दुसऱ्या महिन्यात थेट पाच लाख रुपयांचे बिल देण्यात आले. ही कोणती पद्धत आहे, असा सवाल त्यांनी केला. यावर अधिकाऱ्यांनी बिलाची बाब मान्य केली; मात्र ग्राहकाने आपले म्हणणे कंपनीकडे मांडले आहे का, अशी विचारणा केली. ग्राहकाने आमच्यापर्यंत आले पाहिजे, असे उत्तरही त्यांनी दिले. यावर सभापती पांचाळ यांनी अधिकाऱ्यांना खडसावले. ग्राहकाने तक्रार केली नाही म्हणून महावितरणची जबाबदारी संपते का? कंपनी म्हणून ग्राहकांच्या अडचणी सोडवण्याची जबाबदारी तुमची नाही का? केवळ वीज बिल वसूल करायचे आणि एक महिना बिल थकले की कनेक्शन तोडायला जायचे, हे योग्य नाही. महावितरणची ही मनमानी थांबली नाही, तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
आम्हाला माहिती देण्यास अडचण काय ?
वन विभागाच्या आढाव्यावेळी सदस्य वैभव पाटील यांनी बिबट्यांच्या वाढत्या वावराचा मुद्दा उपस्थित केला. बिबटे पकडल्यानंतर त्यांना नेमके कुठे सोडले जाते, याची माहिती गेल्या सभेपासून मागत असूनही वन विभागाकडून टाळाटाळ केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. आम्हाला माहिती देण्यास अडचण काय, असा सवाल त्यांनी केला.