पालघरवाडीत गणेशोत्‍सव देखाव्‍यातून ‘खेड्याकडे चला’चा जागर 
रत्नागिरी

Ratnagiri News : पालघरवाडीत गणेशोत्‍सव देखाव्‍यातून ‘खेड्याकडे चला’चा जागर

ग्रामीण जीवनशैलीचे वास्तववादी समाजप्रबोधनपर सादरीकरण गणेशभक्‍तांचे लक्ष वेधतेय

पुढारी वृत्तसेवा

मंडणगड : कोकणची समृद्ध ग्रामीण संस्कृती, शेतीप्रधान जीवनपद्धती, सण-उत्सवांची परंपरा आणि रोजगाराच्या शोधात शहरांकडे होणारे स्थलांतर यांचे प्रभावी दर्शन घडविणारा मंडणगड तालुक्यातील पालघरवाडी गणेशोत्सव मंडळाचा यंदाचा समाजप्रबोधनपर देखावा गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत आहे. ‘खेड्याकडे चला’ हा संदेश देणार्‍या या देखाव्यात कोकणच्या मातीशी असलेले नाते आणि बदलत्या सामाजिक वास्तवाचे भावस्पर्शी चित्र उभे करण्यात आले आहे.

या देखाव्यात पारंपरिक शेतीची विविध कामे हुबेहूब साकारण्यात आली असून कवल तोडणी, लावणी, कापणी, मळणी अशा कृषी प्रक्रियांमधून ग्रामीण जीवनाचे चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. विशेष म्हणजे मंडळाच्या छोट्या सदस्यांनी विविध पात्रे साकारून देखाव्यात जिवंतपणा आणला आहे. गणेशोत्सव, दिवाळी, दसरा, शिमगा यांसह कोकणातील ग्रामसंस्कृती, परंपरा, ग्रामस्थांचा एकोपा आणि निसर्गाशी जोडलेले जीवन यांची सुंदर मांडणी छोट्याशा जागेत साकरण्यात आली आहे. जणू लघुरूपात संपूर्ण कोकणच प्रेक्षकांसमोर अवतरते. मात्र देखाव्याचा उत्तरार्ध अंतर्मुख करणारा ठरतो.

रोजगारासाठी शहरांकडे गेलेल्या तरुणांची गावाशी आणि जमिनीशी तुटत चाललेली नाळ, जमिनीची विक्री आणि शेतीपासून दूर जाण्याचे वास्तव प्रभावीपणे मांडण्यात आले आहे. जमीन विकू नका, शेती सोडू नका हा संदेश देणारे धरणीमातेचे पात्र विशेष भावस्पर्शी ठरते. शहरातील धकाधकीच्या जीवनातून गावच्या मातीचे महत्त्व उमगलेल्या तरुणाचा प्रसंग प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतो. ५३ वर्षांपासून पालघरवाडी मंडळ समाजप्रबोधनपर देखाव्यांची परंपरा जपत असून जिल्हा व राज्यस्तरीय पुरस्कारांनी मंडळाच्या कार्याची दखल घेतली आहे. मंडळाचे अध्यक्ष अशोक बैकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा देखावा उभारला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT