रत्नागिरी : रत्नागिरी शहर परिसरासह आजुबाजूच्या परिसरामध्ये पोलीस विभागातर्फे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. मात्र, एकूण बसवण्यात आलेल्या 57 कॅमेर्यांपैकी तब्बल 37 कॅमेरे हे बंद अवस्थेत असून केवळ 20 कॅमेरे कार्यान्वित असल्याची बाब समोर आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील शहरी भागातील गुन्हेगारी, गैरप्रकार आणि अवैध पार्किंग यावर आळा घालण्यासाठी मदत व्हावी, याकरीता 57 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. यापैकी सद्यस्थितीमध्ये जवळपास 50 टक्के कॅमेर्यांची वेळेत देखभाल व दुरुस्ती न झाल्याने बहुतांश कॅमेरे बंद अवस्थेत आहे. ‘डीपीडीसी’ फंडातून हे कॅमेरे बसवण्यात आले होेते. जिल्ह्यातील शहर पोलिस ठाणे हद्दीतील कॅमेर्यांची देखभाल व दुरुस्ती करण्याची जबाबदारी असणार्या कंपनीकडे पोलिस अधीक्षक कार्यालय वेळोवेळी पाठपुरावा देखील करत आहे. दुरुस्ती व देखभाल करण्याची जबाबदारी असणार्या कंपनी प्रतिनिधी बरोबर पोलिस अधीक्षकांनी बैठक घेऊन बंद अवस्थेतील कॅमेरे त्वरित सुरू करावे, अशा सूचना दिल्या आहेत. तसेच कामामध्ये विलंब केल्यामुळे दंड आकारून दंडाची रक्कम भरण्यासाठी सांगण्यात आले आहे. तसेच या कंपनीला काळ्या यादीमध्ये समाविष्ट करण्याच्या हालचाली पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून सुरू असून याबाबतचे पत्र पोलिस महासंचालक कार्यालयाकडे पाठवण्यात आले आहे. बंद सीसीटीव्हीचा मुद्दा विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये चर्चेला आला होता. त्यामुळे बंद अवस्थेतील सीसीटीव्ही कॅमेरे लवकरच सुरू होणार असल्याने पोलिस दलाला मदत होणार आहे.
रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील बंद सीसीटीव्हीचा प्रश्न पावसाळी अधिवेनात उपस्थित झाला होता. यावर खुद्द गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला या बाबत माहिती दिली.