रत्नागिरी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत एकवेळ समझोता योजनेची प्रमाणित कार्यपद्धती आणि पात्र शेतकऱ्यांच्या विशिष्ट क्रमांकांची यादी २० नोव्हेंबर २०२६ रोजी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्ह्यातील आधार प्रमाणीकरणासाठी पात्र ठरलेल्या ५९१ शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध झाली असून, लाभार्थ्यांनी विहित मुदतीत स्वतःच्या हिश्श्याची रक्कम भरून आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) राम कुलकर्णी यांनी केले आहे.
प्रसिद्ध करण्यात आलेली पात्र शेतकऱ्यांची यादी संबंधित ग्रामपंचायत कार्यालय, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था कार्यालय, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा स्तर, तसेच सर्व राष्ट्रीयीकृत व ग्रामीण बँकांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. या यादीत शेतकऱ्याचे नाव, बँकेचा तपशील, विशिष्ट क्रमांक, ३१ मार्च २०२६ रोजीची थकीत कर्ज रक्कम (स्तंभ ९), हेअरकट सवलत वजा जाता थकीत रक्कम (स्तंभ १०), शेतकऱ्याने भरावयाचा हिस्सा (स्तंभ ११) आणि पात्र शासकीय लाभाची रक्कम (स्तंभ १२) यांचा समावेश आहे.
एकवेळ समझोता योजना ३१ मार्च २०२७ पर्यंत वैध राहील. हा पर्याय निवडणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या हिश्श्याची रक्कम ३१ मार्च २०२७ पर्यंत भरणे बंधनकारक आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी अॅग्रीस्टॅक नोंदणी (फार्मर आयडी) क्रमांक अनिवार्य आहे. ज्या शेतकऱ्यांची अॅग्रीस्टॅक नोंदणी झालेली नाही, त्यांनी तात्काळ जवळच्या ‘आपले सरकार सेवा केंद्रावर’ जाऊन ती पूर्ण करून घ्यावी.
एकच कर्ज खाते असल्यास स्तंभ ११ मधील स्वतःचा हिस्सा संबंधित बँक शाखेत भरणे आवश्यक आहे. पात्र थकीत रक्कम २.६० लाख असल्यास प्रथम स्वतःचा हिस्सा म्हणून ६०,००० रुपये भरावे लागतील, त्यानंतर नियमानुसार पात्र रकमेवर पुढील कार्यवाही होईल एकापेक्षा जास्त कर्ज खाती असल्यास शेतकरी आपला हिस्सा कोणत्याही एका कर्ज खात्यात भरू शकतो, मात्र एका खात्यात भरावयाची कमाल रक्कम स्तंभ १० मधील रकमेपेक्षा जास्त नसावी. याबाबत संबंधित बँका योग्य मार्गदर्शन करतील.
बँकांनी शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या रकमेची माहिती दर शुक्रवारी महाआयटी पोर्टलवर अद्ययावत करावी व संबंधित शेतकऱ्याला कळवावे. पोर्टलवर रक्कम भरल्याची नोंद झाल्यानंतर ३ दिवसांनी आधार प्रमाणीकरणाची सुविधा सुरू होईल; त्यानंतर शेतकऱ्यांनी नियुक्त ‘आपले सरकार सेवा केंद्रावर’ जाऊन आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे.
आधार प्रमाणीकरण, तक्रार नोंदणी आणि तक्रार निवारणाची प्रक्रिया कर्जमाफी योजनेप्रमाणेच राहील. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर शासकीय लाभाची रक्कम शेतकऱ्याच्या कर्ज खात्यात वर्ग केली जाईल आणि शासकीय हिस्सा प्राप्त झाल्यानंतर बँक संबंधित कर्ज खात्याचे लेजर (खातेपुस्तिका) अद्ययावत करेल.