रत्नागिरी : ‘गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात शनिवारी सायंकाळपासून जिल्ह्यात गणेशमूर्ती आणि गौराईच्या विसर्जनाला सुरुवात झाली. पाच दिवस भक्तिभावाने पूजन केलेल्या बाप्पाला आणि गौराईला निरोप देताना गणेशभक्त भावुक झाले.
जिल्ह्यातील १७ सार्वजनिक मंडळांच्या १७ गणेशमूर्ती, ७४ हजार १८१ घरगुती मूर्ती आणि ३२ हजार ९४१ गौराईंचे विविध समुद्रकिनारे, नद्या आणि विसर्जनस्थळी भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले.
गणेशोत्सवानिमित्त जिल्ह्यात दाखल झालेल्या चाकरमान्यांमुळे गेल्या काही दिवसांपासून शहरांसह ग्रामीण भागही गजबजून गेला होता. सोमवार, १४ रोजी लाडक्या बाप्पाचे घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये उत्साहात आगमन झाले. त्यानंतर विविध ठिकाणी धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, भजन, कीर्तन, नाच-गाणी आदींची रेलचेल सुरू होती. गौराईचेही पारंपरिक पद्धतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. शनिवारी दुपारपासून काही ठिकाणी, तर सायंकाळी चारनंतर बहुतांश ठिकाणी गणेशमूर्ती आणि गौराईच्या विसर्जन मिरवणुका निघाल्या. ढोल-ताशांचा गजर, बँडबाजा, भजने आणि भक्तिगीतांच्या तालावर गणेशभक्तांनी मिरवणुका काढल्या. पालखी, रथ तसेच आकर्षक सजावट केलेल्या गणेशमूर्ती मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरल्या.
मांडवी, भाट्ये यांसह जिल्ह्यातील विविध समुद्रकिनारे आणि विसर्जन घाटांवर सायंकाळपासून भाविकांची मोठी गर्दी झाली होती. रात्री उशिरापर्यंत अनेक ठिकाणी विसर्जनासाठी रांगा लागल्या होत्या. बाप्पाला निरोप देताना अनेक भाविकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषाने समुद्रकिनारे दुमदुमून गेले.
विसर्जनस्थळी प्रशासनाची जय्यत तयारी
विसर्जन सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पडावे, यासाठी प्रशासनाकडून विसर्जनस्थळी आवश्यक व्यवस्था करण्यात आली होती. स्वच्छता, विद्युत रोषणाई, निर्माल्य संकलनासाठी वाहने तसेच सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या. समुद्रकिनारे आणि विसर्जन घाटांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
पोलिसांची करडी नजर
विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी जिल्हा पोलिस विभागाने विविध ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त ठेवला होता. प्रमुख मार्गांवर बॅरिकेडिंग करण्यात आले होते. मिरवणुकीवर सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवण्यात येत होते. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठीही पोलिसांकडून नियोजन करण्यात आले होते.