Neeraj Jangra
खेड पोलिसांनी नीरज महेंद्र जांगरा याला चंदीगढ येथून अटक केली.   Pudhari News Network
रत्नागिरी

रत्नागिरी: खेडमधील एकाला २४ लाखांचा गंडा; आरोपीला चंडीगढ येथून अटक

पुढारी वृत्तसेवा

खेड, पुढारी वृत्तसेवा: चंडीगढ येथून बनावट “ट्रेडिंग ॲप्लिकेशन” व “शेअर मार्केट ट्रेडिंग” करून जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून खेडमधील एकाला २४ लाख ८५ हजार रुपयांना फसवणाऱ्या भामट्याला खेड पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी एक महिन्याच्या आत या प्रकरणाचा छडा लावला. आरोपीला न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

या प्रकरणी दि ३ जून २०२४ रोजी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील तक्रारदार यांनी २४ लाख ८५ हजार ही रक्कम आरोपीच्या सहा वेगवेगळ्या बँक अकाउंट वर पाठविलेली होती. सदर सहा बँक अकाऊंट बाबत खेड पोलीस तपास पथकाद्वारे अधिक माहिती घेण्यात आली. तक्रारदार यांच्याकडून आरोपी यांनी घेतलेली रक्कम त्यांनी पुढे अन्य ४३ बँक खात्यामध्ये मध्ये वळवण्यात आल्याचे व पुढे २२ वेगवेगळ्या बँक खतांमध्ये मध्ये वळवण्यात आल्याबाबत पोलीस तपासात माहिती समोर आली.

तक्रारदाराच्या रक्कमे पैकी ४ लाख ५० हजार रुपये जमा करण्यात आलेल्या एका बँक खात्यातून चंडीगढ़ व जोधपूर येथील एटीएम मशीनचा वापर करून काढण्यात आले असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, चंडीगढ़ व जोधपूर-राजस्थान या राज्यांमध्ये खेड पोलीस ठाण्याचे एक तपास पथक पाठविण्यात आले.

तपास पथकाने मुख्य आरोपी नीरज महेंद्र जांगरा (वय २२, सध्या रा. १७८, सेक्टर ३८ (A), चंडीगढ, मूळ रा. कुर्दल, ७० भिवाणी-हरियाणा) हा चंडीगढ येथे पोलिसांना मिळून आला.

हा गुन्हा करताना त्याने अनेकांना शेअर मार्केटच्या नावाखाली जास्त नफा मिळवून देण्याचे आमीष दाखवून वेग-वेगळ्या फर्मच्या नावाने अनेक बँक खाते उघडून त्यावर अनेकांकडून रक्कम प्राप्त करुन घेऊन अनेक बँक खात्यांचा व मोबाईल नंबरचा वापर करून फसवणूक केली असल्याचे प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालेले आहे.

या गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे. ही कारवाई खेडचे पोलीस निरीक्षक नितीन भोयर, सहायक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, पोलीस हवालदार दीपक गोरे, कर्मचारी वैभव ओहोळ, रुपेश जोगी, सुमित नवघरे, शिरीष साळुंखे, रमीज शेख, तांत्रिक विश्लेषण शाखा व सायबर पोलीस ठाण्यामधील सौरभ कदम यांनी केली.

SCROLL FOR NEXT