October hit  file photo
रत्नागिरी

Ratnagiri News : रत्नागिरीत ऑक्टोबर हीटचा कहर; पारा ३९.२ अंशांवर!

ऑक्टोबर महिन्यातील १४३ वर्षांचा उच्चांक मोडल्याचा दावा

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : जिल्ह्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून मंगळवारी तापमानाने ३९.२ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला. वाढत्या उन्हामुळे रत्नागिरीकर हैराण झाले आहेत. ऑक्टोबर महिन्यातील १४३ वर्षांचा उच्चांक मोडल्याचा दावा करण्यात येत असून, यंदाचे तापमान सरासरीपेक्षा ७.६ अंशांनी अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. वाढत्या उष्म्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी उन्हात जाणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

यंदा पावसाने अपेक्षित साथ न दिल्याने जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जून आणि जुलैमध्ये समाधानकारक पाऊस झाला असला, तरी त्यानंतर पावसाने ओढ दिली. आता त्यातच ऑक्टोबर हीटच्या तीव्रतेची भर पडली आहे. सकाळी ९ वाजल्यापासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत उकाडा जाणवत असून दिवसा कडक ऊन, सायंकाळी ढगाळ वातावरण आणि रात्रीही उष्णतेचा त्रास असे चित्र आहे. दुपारच्या वेळी उन्हाची तीव्रता वाढत असल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. कामानिमित्त घराबाहेर पडताना अनेकजण टोपी, तोंडावर रुमाल आणि डोळ्यांवर गॉगल लावत आहेत. उन्हाचा चटका वाढल्याने दुपारच्या सुमारास शहरातील रस्त्यांवरील वाहनांची वर्दळही तुलनेने कमी दिसत आहे. यापूर्वी २० ऑक्टोबर १९७७ रोजी रत्नागिरीत ३७.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. यंदा तापमान ३९.२ अंशांवर पोहोचल्याने उष्णतेची तीव्रता अधोरेखित झाली. मात्र, १४३ वर्षांचा उच्चांक मोडल्याचा दावा प्रसिद्ध करण्यापूर्वी संबंधित हवामान नोंदींची अधिकृत पडताळणी आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT