रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यामुळे मोठ्या प्रमाणात उष्मा वाढला आहे. वाढत्या तापमानाने नागरिकांसह विद्यार्थी हैराण झाले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा १९ जूनपासून सकाळी भरवण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
पावसाचे आगमन झाल्यास पुन्हा पूर्वीच्या वेळेनुसार शाळा भरतील, असा ठराव घेण्यात आला असल्याची माहिती जि.प. अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांनी दिली. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे जिल्ह्यात उन्हाळ्यासारखे तापमान झाले असून उष्म्यामुळे मुलांना त्रास वाढत आहे.
शाळा सकाळच्या वेळेत घ्याव्यात, अशी मागणी विविध संघटनांच्या वतीने करण्यात आली होती. यासंदर्भात चर्चा करून जिल्हा परिषद शाळा सकाळी घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसे आदेश जिल्हा परिषदेच्या शाळांना पाठवण्यात येणार आहेत.