येलोंदेवाडी धरणग्रस्त ११० कुटुंबे पुनर्वसनापासून वंचित 
रत्नागिरी

Ratnagiri News : येलोंदेवाडी धरणग्रस्त ११० कुटुंबे पुनर्वसनापासून वंचित

विहिरी जलमय; पिण्याच्या पाण्याचे भीषण संकट, घरांनाही धोकादखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

चिपळूण : तालुक्यातील येलोंदेवाडी लघुपाटबंधारे प्रकल्पामुळे बाधित झालेल्या देवखेरकी (सुतारवाडी), देवखेरकी (भेलेवाडी) आणि शिरवली येथील तब्बल ११० कुटुंबे अद्याप पुनर्वसनापासून वंचित असल्याचा गंभीर आरोप होत आहे. धरणातील पाणीसाठ्यामुळे सार्वजनिक विहिरी जलमय झाल्याने पिण्याच्या पाण्याचा तीव्र प्रश्न निर्माण झाला आहे. वाढत्या जलपातळीमुळे अनेक घरांवरही धोका निर्माण झाला आहे. या प्रश्नाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास ग्रामस्थांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्या शिवानी सावंत आणि संदीप सावंत यांनी दिला आहे.

यंदा प्रथमच येलोंदेवाडी धरणात पाणी साठवण्यात आल्याने परिसरातील तीन सार्वजनिक विहिरी पूर्णपणे पाण्याखाली गेल्या आहेत. त्यामुळे शेकडो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत बंद पडला आहे. दुसरीकडे धरणालगत झालेले उत्खनन आणि वाढत्या जलसाठ्यामुळे देवखेरकी (सुतारवाडी), देवखेरकी (भेलेवाडी) आणि शिरवली येथील अनेक घरे धोक्याच्या छायेत आली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर शिवानी सावंत यांनी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि संबंधित विभागांना निवेदन देऊन संयुक्त पाहणी, पर्यायी पिण्याच्या पाण्याची तातडीने व्यवस्था आणि धोक्यात आलेल्या घरांसाठी संरक्षणात्मक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

पुनर्वसनातून वगळलेल्या ११० कुटुंबांचा धरणग्रस्त म्हणून समावेश करून त्यांना योग्य आर्थिक मोबदला देत सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. सुमारे अडीचशे कोटी रुपयांच्या या प्रकल्पातील काही बाधितांचे पुनर्वसन झाले असले, तरी उर्वरित कुटुंबांना ना पुनर्वसनाचा लाभ मिळाला, ना मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.

धरण पूर्ण क्षमतेने भरल्यास सुतारवाडीसह परिसरातील वस्ती धोक्यात येण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा व्यापक लोकआंदोलन उभारले जाईल, असा इशारा शिवानी सावंत यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT