चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गामुळे पाग-बौद्ध कॉलनी परिसरातील नागरिकांना रस्ता ओलांडताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत असल्याने या ठिकाणी पादचारी भुयारी मार्ग उभारण्यात यावा, अशी मागणी परिसरातील महिलांनी केली आहे. यासंदर्भात मंगळवारी पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांना निवेदन सादर करण्यात आले.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर चिपळूण प्रांत कार्यालय ते कापसाळ विश्रामगृह या सुमारे १ किलोमीटरच्या टप्प्यात उड्डाणपूल उभारण्याची मागणी चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समितीच्या चिपळूण शाखा क्रमांक १ च्या वतीने करण्यात आली आहे. दरम्यान, उड्डाणपुलाच्या जोडरस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात भरावाचे काम सुरू असल्याने पाग-बौद्ध कॉलनीतील नागरिकांसाठी महामार्ग ओलांडणे अधिकच कठीण झाले आहे. उर्वरित उड्डाणपुलाचे काम पूर्ण होण्यास आणखी काही वर्षे लागण्याची शक्यता असल्याने तोपर्यंत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रत्नागिरी-निवळी येथील भुयारी मार्गाच्या धर्तीवर पाग-बौद्ध कॉलनी परिसरात पादचारी भुयारी मार्ग उभारण्यात यावा, अशी मागणी महिलांनी केली आहे.
याबाबत माजी नगरसेविका उज्वला जाधव यांनी सांगितले की, चिपळूण शहराच्या हद्दीपासून कापसाळ विश्रामगृहापर्यंत राष्ट्रीय महामार्गाचा सुमारे ३ किलोमीटरचा टप्पा आहे. यापैकी २ किलोमीटर अंतरात उड्डाणपुलाचे काम झाले असून प्रांत कार्यालय ते कापसाळ विश्रामगृह या उर्वरित १ किलोमीटरच्या टप्प्यात अद्याप उड्डाणपूल उभारण्यात आलेला नाही. त्यामुळे या परिसरातील हजारो नागरिकांना वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
या महामार्गालगत महाविद्यालये, हायस्कूल, मराठी शाळा, जिल्हा न्यायालय, पोलिस ठाणे, तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती, सिटी सर्व्हे कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय तसेच एसटी महामंडळाच्या सुविधा असल्याने या मार्गावर नागरिकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रांत कार्यालय ते कापसाळ विश्रामगृह या टप्प्यात उड्डाणपूल उभारण्याबाबत पालकमंत्र्यांनी वैयक्तिक लक्ष घालून तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली.
विशेषतः पाग-बौद्ध कॉलनी परिसरातील विद्यार्थी आणि मोलमजुरी करणार्या महिलांना महामार्ग ओलांडताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या भरावाच्या ठिकाणीच पादचारी भुयारी मार्गाची व्यवस्था करून त्याचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी माजी नगरसेविका उज्वला जाधव, मंदाकिनी मोहिते, राजेश्री जाधव, भारती सकपाळ, निधी जाधव, सुनीता जाधव, दीप्ती कदम, पर्वा जाधव, राखी जाधव, निकिता जाधव, प्रीती मोहिते, प्रतिभा सकपाळ, स्नेहा गमरे, प्रतीक्षा तांबे, उमा कदम, नीलम गायकवाड, अनिता मोहिते, ललिता मोहिते आणि स्मिता जाधव यांच्यासह नगराध्यक्ष उमेश सकपाळ, राजू जाधव, डॉ. अशोक सकपाळ, प्रशांत मोहिते, राजेंद्र जाधव, तुळशीराम जाधव, विलास सकपाळ, विलास जाधव आदी उपस्थित होते.