रत्नागिरी : "पानवल धरणाचे नूतनीकरण हा केवळ रत्नागिरी शहरासाठीच नव्हे, तर माझ्या राजकीय जीवनातीलही एक ऐतिहासिक आणि समाधानाचा क्षण आहे," असे भावुक प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. रत्नागिरीकरांची पाण्याची चिंता कायमची मिटवणाऱ्या सुधारित पानवल धरणाच्या नूतनीकरणाचा भव्य लोकार्पण सोहळा नुकताच उत्साहात पार पडला.
या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी व्यासपीठावर शिवसेना आणि भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. हे धरण रत्नागिरीच्या विकासात मैलाचा दगड ठरणार असून, निसर्गाने दिलेल्या ग्रॅव्हिटी (उतारावर) आधारित रचनेमुळे येथे पाणी उपसण्यासाठी आणि विजेसाठी येणारा खर्च अत्यंत नगण्य असेल. या धरणातून आता साडेसात एमएलडी पाणी मिळणार आहे. त्यामुळे भविष्यात शहराला पाण्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून राहण्याची अजिबात गरज भासणार नाही, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला. १९६२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते या धरणाचे भूमिपूजन झाले होते, याची आठवण काढत आज याच्या विस्तारीकरणाची संधी मिळणे हे आपले भाग्य असल्याचे सामंत यांनी सांगितले.
धरणासाठी आपल्या जमिनी देणाऱ्या पानवल ग्रामस्थांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध असून, या परिसराचा कायापालट करण्यासाठी हे धरण आता पर्यटनाचे केंद्र म्हणून विकसित केले जाईल. येथे वॉटर स्पोर्टस् सुरू करण्यासाठी चालू पावसाळ्यातच आराखडा तयार केला जाईल व त्यासाठी आवश्यक असणारा निधी जिल्हा नियोजन समितीतूून उपलब्ध करून दिला जाईल, अशी घोषणा केली. विशेष म्हणजे, या जलक्रीडा व्यवसायात स्थानिक पानवल गावातील तरुणांनाच रोजगाराचे पहिले प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही दिली.
गेल्या २५ वर्षांत नगर परिषदेला पानवल गावातील धरणाकडे येणारा रस्ता करता आला नाही, याबद्दल खंत व्यक्त करत पालकमंत्र्यांनी नगर परिषदेला धारेवर धरले. पुढील चार महिन्यांत या रस्त्याचे इस्टिमेट तयार करून आगामी शिमगोत्सवापूर्वी (होळी) हा रस्ता डांबरीकरण करून पूर्ण करावा, अशी कडक सूचना त्यांनी दिली. यासाठी निधी कमी पडल्यास नियोजन मंडळातून पैसा देण्याची तयारी त्यांनी दर्शवली. दरम्यान, गणपतीपुळे येथील दुर्घटना लक्षात घेता, पर्यटनाच्या नावाखाली धबधब्यांवर हुल्लडबाजी करून स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्यांवर कडक पोलिस कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
भाषणादरम्यान पालकमंत्री उदय सामंत यांनी भाजपचे शहराध्यक्ष दादा ढेकणे आणि 'निर्माण इन्फ्रा' कंपनीचे विशेष कौतुक केले. राजकीय मतभेद बाजूला ठेवून महायुती म्हणून एकत्र काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. बिपीन बंदरकर आणि दादा ढेकणे यांनी हातात हात घालून काम करावे, असे सांगत त्यांनी दादा ढेकणे व्यासपीठावर उपस्थित असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. तसेच 'निर्माण' कंपनीचे कौतुक करताना ते म्हणाले की, आतापर्यंत ही कंपनी फक्त इमारती बांधकामात प्रसिद्ध होती. मात्र, आज स्थानिक माणसांनी एकत्र येऊन एक ऐतिहासिक धरण बांधून दाखवले आहे. 'निर्माण' कंपनीने राजिवड्याच्या बंधाऱ्याचे कामही अत्यंत वेगाने करत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
या लोकार्पण प्रसंगी पालकमंत्री ना. सामंत यांच्यासह नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, जि.प.चे उपाध्यक्ष विलास चाळके, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, पाणी सभापती निमेश नायर, नगरसेवक बाळू साळवी, बंड्या साळवी, नगरसेविका स्मीतल पावसकर, प्रिती सुर्वे, भाजपाचे नगरसेवक राजू तोडणकर, नितीन जाधव, नगरसेविका व भाजपा महिला जिल्हाध्यक्षा वर्षा ढेकणे, भाजपा शहराध्यक्ष दादा ढेकणे, शिवसेना शहरप्रमुख बिपीन बंदरकर, पं.स. सभापती प्रवीण पांचाळ, जि.प. सदस्य बाबू म्हाप, प्रकाश रसाळ, मुख्याधिकारी वैभव गारवे, लोकप्रतिनिधीप्रांताधिकारी जीवन देसाई, नगर परिषदे कर्मचारी पाटबंधारे, नगरसेवक, जि.प. व पं.स.चे सदस्य पानवल व हातखंबा ग्रामस्थ, रत्नागिरीतील नागरिक उपस्थित होते.