दोन लाख वृक्षलागवड; बहुतांश सुकली! 
रत्नागिरी

Ratnagiri News : दोन लाख वृक्षलागवड; बहुतांश सुकली!

मुंबई-गोवा चौपदरीकरणानंतर पर्यावरण संवर्धनावर प्रश्नचिन्ह; ठेकेदारांच्या निष्काळजीपणावर संताप

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी तब्बल १ लाख १५ हजार ६१६ झाडांची कत्तल करण्यात आल्यानंतर त्याच्या भरपाईसाठी परशुराम ते झाराप दरम्यान १ लाख ९६ हजार ११२ वृक्षांची लागवड केल्याचा दावा राष्ट्रीय महामार्ग विभागाने केला आहे. मात्र, प्रत्यक्षात या झाडांपैकी बहुतांश झाडे सुकलेली किंवा मृत अवस्थेत दिसत असून, जिवंत झाडांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच असल्याने ठेकेदारांच्या अनास्थेविरोधात संताप व्यक्त होत आहे.

नागरिक, पर्यावरणप्रेमी व सामाजिक संघटनांनी आवाज उठवल्यानंतर अखेर राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या रत्नागिरी कार्यालयाने सविस्तर आकडेवारी जाहीर केली. विभागाच्या माहितीनुसार, परशुराम ते आरवली मार्गावर दुतर्फा १८,०७१ आणि दुभाजकात ७,८२५ अशी एकूण २५,८९६ झाडे लावण्यात आली. आरवली ते काटे टप्प्यात ११,६१८, तळेकांटे ते वाकेडमध्ये १६,३६८, वाकेड ते तळगावदरम्यान १६,०३०, तळेगाव ते कळमट भागात ५८ हजार तर कळमट ते झाराप या टप्प्यात तब्बल ६८ हजार वृक्षांची लागवड करण्यात आल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.

सर्व टप्प्यांतील आकडे एकत्रित केल्यास महामार्गाच्या दुतर्फा ९०,२३५ आणि दुभाजकांमध्ये १,०५,८७७ अशी एकूण १,९६,११२ झाडे लावण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या वृक्षांची निगा राखण्यात मोठ्या प्रमाणावर हलगर्जीपणा झाल्याचे वास्तव समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर महामार्ग विभागाने मृत झाडांच्या जागी पुन्हा नवीन झाडे लावण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. कंत्राटदारांना नवीन खड्डे खोदण्याचे आदेश देण्यात आले असून, आगामी पावसाळ्याच्या मध्यापर्यंत पुनर्लागवड पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे विभागाने स्पष्ट केले. तसेच, दुभाजकांमध्ये साचलेला डांबरी व काँक्रीटचा राडारोडा हटवून सुपीक माती टाकणे, टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा करणे , गवत साफ करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT